सातारा : इंदोली फाट्यावर मरण यातना | पुढारी

सातारा : इंदोली फाट्यावर मरण यातना

उंब्रज (पुढारी वृत्तसेवा) ः पुणे – बंगळूर महामार्गावर इंदोली फाटा परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने करण्यात आलेल्या पर्यायी मार्गाच्या डागडुजीकडे महामार्ग प्राधिकरणासह ठेकेदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना अक्षरशः मरण यातना भोगाव्या लागत आहेत. वाहतूक कोंडी, खड्ड्यांसह चिखलाच्या साम्राज्यामुळे होणारे छोटे – मोठे अपघात याकडे डोळेझाक सुरू असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा आणि कर्मदरिद्रीपणाकडे केवळ बघ्याची भूूमिका घेत पहात बसणार्‍या महामार्ग प्राधिकरणाबाबत संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

इंदोली फाटा येथे मागील वर्षी अंडर पास पुलाचे काम सुरू झाले होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस रस्त्यावर वळविण्यात आली असून आजही याच सर्व्हिस रस्त्याने वाहतूक सुरू आहे. सर्व्हिस रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने काही दिवसातच ‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता’ आहे ? असा प्रश्‍न निर्माण होतो आहे. पावसाळ्यास प्रारंभ झाल्यानंतर वाहन चालकांसह स्थानिकांना होणार्‍या त्रासाबाबत दैनिक ‘पुढारी’ने आवाज उठवल्यानंतर ठेकेदाराकडून केवळ मलमपट्टी करण्यात आली होती. ही मलमपट्टी एवढी निकृष्ट दर्जाची होती की एक ते दोन पावसात खड्ड्यांची अवस्था जैस – थे झाली आहे.

खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात होतात अपघात

एक ते दीड फुटाच्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांची होते कसरत
महामार्ग प्राधिकरणाकडून भयावह परिस्थितीकडे अक्ष्यम दुर्लक्ष

ठेकेदार कंपनीस काळ्या यादीत टाका!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्र व्यवहार करून संबंधित ठेकेदार कंपनीस काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली आहे. आता 8 दिवसात दर्जेदार रस्ता न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्वरित लक्ष घालणे गरजेचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपूत्र आहेत. त्यांच्याच जिल्ह्यात वाहन चालकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या विषयात लक्ष घालून आता या रस्त्याचे काम त्वरित दर्जेदार करण्याची सूचना करावी, अशी मागणीही होत आहे.

Back to top button