राष्ट्रीय महामार्ग : सहापदरीकरणासाठी अतिक्रमणांवर हातोडा | पुढारी

राष्ट्रीय महामार्ग : सहापदरीकरणासाठी अतिक्रमणांवर हातोडा

कराड; पुढारी वृत्तसेवा : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वळसे (ता. सातारा) ते कागल (कोल्हापूर) या दरम्यानचा मार्ग रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत महामार्गावरील मुख्य लेन व सेवा रस्ता यामधील अतिक्रमणे काढण्यास शुक्रवारी सुरूवात झाली आहे.

कराड व सातारा तालुक्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गालगतची अतिक्रमणे काढून महामार्गाच्या सहापदरीकरणावेळी नव्याने होणार्‍या उड्डाण पुलांसाठी महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यांवर वळविण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

२००६ साली पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आजवर या महामार्ग देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाकडे आहे. रस्ते विकास महामंडळाकडे २७ मार्च २०२२ पर्यंत हे अधिकार असून त्यानंतर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित होणार आहे.

एप्रिल २०२२ पासून प्रत्यक्षात सातारा ते कागल यादरम्यान सहापदरीकरणावेळी नव्याने होणाऱ्या उड्डाण पुलासह सहापदरीच्या अन्य कामांना सुरूवात होण्याची शक्यता आहे.

 गोटे गावच्या हद्दीतून अतिक्रमणे काढण्यात सुरूवात

या पार्श्वभूमीवर रस्ते विकास महामंडळाकडून पहिल्या टप्प्यात सेवा रस्ता आणि महामार्गावरील मुख्य लेन यामधील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. त्यास कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीतून प्रारंभ करण्यात आला आहे.

ही अतिक्रमण मोहिम सातारा तालुक्यातील वळसे या गावापर्यंत राबविली जाणार आहे. तसेच कराड तालुक्यातील दक्षिणसह विभागासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अतिक्रमणे हटवली जाणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button