आदित्य ठाकरेंचे आव्हान बंडखोर स्वीकारणार? | पुढारी

आदित्य ठाकरेंचे आव्हान बंडखोर स्वीकारणार?

पाटण : पुढारी वृत्तसेवा पाटण तालुक्यात दोनच नेते. त्यांचेच राजकीय गट आणि ते ठरवतील तो पक्ष. या पारंपारिक राजकारणाला तिलांजली देणारी आ.आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा ठरली. निष्ठावंत शिवसैनिक औषधापुरताच शिल्लक राहिलाय या फाजील आत्मविश्वासाला मोडीत काढून झालेली ही यात्रा भविष्यातील परिवर्तनाची नांदी ठरेल काय? आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांचा शेलक्या शब्दात समाचार घेताना हिंमत असेल तर राजीनामा देवून पुन्हा निवडून या असे आव्हान दिले आहे. हे आव्हान बंडखोर स्वीकारणार का, हे पाहणेही राजकीय दृष्ट्या औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिवसेनेतील बंडाळीनंतर प्रामुख्याने पाटण तालुक्यात आ. शंभूराज देसाई यांचे वर्चस्व लक्षात घेता येथे आ.आदित्य ठाकरेंचा निष्ठा दौरा यशस्वी होणार नाही, अशा शक्यता वर्तवल्या गेल्या होत्या. यासाठी आयोजकांकडून प्रचार तर विरोधकांकडून अपप्रचार झाला होता. मात्र ऐनवेळी या यात्रेला अनपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने मुळच्या सेनेसह देसाई गट, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस व भाजपाचेही डोळे दीपल्याचे राजकीय चित्र आहे.आ. आदित्य ठाकरे यांनी आपल्या आक्रमक वक्तव्यातून सर्वच बंडखोर आमदार, खासदारांचा खरपूस समाचार घेतला. भाषणात त्यांनी एकदाही आ. देसाईंचे नाव घेतले नाही मात्र अप्रत्यक्षपणे त्यांना दिलेला गर्भित इशारा, निष्ठावतांना भावनिक साद व गद्दारीवर केलेले भाष्य शिवसैनिकांना उर्जा देणारे ठरले.

शिवसेनेने या गद्दारांना भरभरून दिले, मंत्री झाल्यावर त्यांनीही भरपूर कमावले पण ते पचवायला अवघड झाल्यानेच त्यांनी उद्धव ठाकरे व निष्ठावंत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे जाहीर वाभाडे काढले. इतर शिवसेना नेत्यांनीही आ. देसाई यांच्यावर परखड व जहरी टीका करून पाटण तालुक्यात कोणाचीही दहशत अथवा मक्तेदारी नाही हे दाखवून दिले. या दौर्‍यानंतर तात्काळ आ. देसाई यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना ही यात्रा राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याचे जाहीर करून टाकले. वास्तविक या दौर्‍याशी राष्ट्रवादीचा कोणताही संबंध नव्हता. उलट या सभेला आ. देसाई यांचे निष्ठावंत कार्यकर्तेही उपस्थित असल्याचे सेना जिल्हाप्रमुख हर्षल कदम यांनी जाहीर केले.

निश्चितच यापुढे सातत्याने आरोपांचा कलगीतुरा निष्ठावंत व बंडखोर शिवसेना नेते व पदाधिकार्‍यांमध्ये पहायला मिळणार आहे.
आ. आदित्य ठाकरे यांचा झंझावात महाराष्ट्रभर पहायला मिळत आहे. पाटण तालुक्यातही त्याची अनपेक्षित झलक पाहायला मिळाल्याने येणार्‍या काळातील ही परिवर्तनाची नांदी आहे काय? याचा निष्ठावंत शिवसैनिक किंवा आ. देसाईंचे पारंपारिक राजकीय विरोधक कशा पद्धतीने फायदा उठवणार हेही येणार्‍या काळात स्पष्ट होणार आहे .

बंडखोरी तुम्ही केली, आणि ..

महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी मिळाला नाही अशी ओरड आ.देसाई करत आहेत. मग अडीच वर्षांत केलेल्या कोट्यवधींच्या निधीच्या घोषणा खोट्या होत्या का, असा प्रश्न राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते विचारत आहेत. आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्राही राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याचा आरोप आ. देसाईंनी केल्याने निष्ठावंत शिवसैनिक बिथरले आहेत. तुम्ही सेनेशी गद्दारी केली आणि याचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर का फोडता असा सवालही राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत.

Back to top button