कराड : चाफळ परिसरातील १३ बंद घरे चोरट्यांनी फोडली, १९ तोळे सोने लंपास (Video) | पुढारी

कराड : चाफळ परिसरातील १३ बंद घरे चोरट्यांनी फोडली, १९ तोळे सोने लंपास (Video)

चाफळ (जि. सातारा) : पुढारी वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील चाफळ परिसरातील गमेवाडी, जाळगेवाडी, माथणेवाडी गावातील १३ बंद असलेली घरे फोडून चोरट्यांनी फोडली. यामध्ये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. बुधवार दिनांक ३ रोजी रात्री ही घटना घडली. चोरट्याने चाफळ परिसरात धुमाकूळ घातल्याची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गमेवाडी येथील अमोल बाळकृष्ण देसाई व मुबारक अब्दुल मुल्ला, माथणेवाडी येथील आत्माराम नारायण माथणे, आनंदराव शिवराम माथणे, जाळगेवाडी येथील बाळाराम गणपत साळुंखे, अमोल चंद्र साळुंखे, महादेव भिकू चव्हाण, श्रीरंग पांडुरंग साळुंखे, रामचंद्र लक्ष्मण साळुंखे, तात्याबा मानकर, कुष्णत शंकर काटे, साहेबराव अंतू साळुंखे यांची घरे व बंगले चोरट्याने बुधवारी रात्री एकाच रात्रीत फोडली.

चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. घटनेची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे सपोनि उत्तम भापकर, पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, चाफळ दूरक्षेत्राचे मनोहर सुर्वे, सिध्दनाथ शेडगे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत किती रक्कम व सोन्याचे दागिने चोरीला गेले यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

असे असले तरी या घटनेमध्ये अंदाजे दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने व लाखो रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकंदरीत एकाच रात्री १३ घरे अज्ञात चोरांनी फोडल्याने चाफळ परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Back to top button