Satara : किसनवीर, खंडाळा कारखाना 1 ऑक्टोबरला सुरू करणार | पुढारी

Satara : किसनवीर, खंडाळा कारखाना 1 ऑक्टोबरला सुरू करणार

भुईंज : पुढारी वृत्तसेवा किसनवीर कारखान्यासाठी 20 कोटी रूपयांचे भागभांडवल जमा झाले आहे. व्यवस्थापनाने जे 100 कोटी रूपये भाग भांडवलापोटी जमा करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे ते लवकरच पूर्ण करणार आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्यासाठी लागणार्‍या यंत्रणेचे करारही झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती खंडाळा आणि किसन वीर हे दोन्ही कारखाने 1 ऑक्टोबरला सुरू करणार असल्याची ग्वाही किसनवीर कारखान्याचेृ अध्यक्ष आ. मकरंद पाटील यांनी दिली. किसन वीर कारखान्याच्या मिल रोलर पूजनप्रसंगी आ. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. मकरंद पाटील म्हणाले, रोलर पूजनाचा क्षण शेतकरी व कर्मचार्‍यांच्यादृष्टीने आनंदाचा व महत्वाचा क्षण आहे.

2003 मध्ये कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी वेगळं चित्र निर्माण करून कारखाना ताब्यात घेतला. त्यावेळी कारखान्यामध्ये जवळपास 7 लाख 30 हजार साखर पोती शिल्लक होती तसेच बँकेकडे किरकोळ कर्ज होते. फक्त 50 रूपयांचा हप्ता दिवाळीकरता देऊ न शकल्यामुळे कारखाना विरोधकांकडे गेला. परंतु आम्ही कारखाना ताब्यात घेतला तेंव्हा कारखान्यावर ना साखर शिल्लक, ना अल्कोहोल शिल्लक, ना शेतकर्‍यांना एफआरपी ना कर्मचार्‍यांना पगार. शिल्लक होती ती फक्त आणि फक्त देणी आणि देणीच. या संकटकालीन परिस्थितीत सभासद शेतकर्‍यांनी मोठ्या विश्‍वासाने कारखान्याची सूत्रे आमच्या हातात दिली. संकटांना न डगमगता येणारा हंगाम यशस्वी करणार आहे. सभासद व कर्मचार्‍यांच्या स्वप्नातील किसन वीर कारखाना पुन्हा दिमाखात उभा करणार आहे.
सभासद, शेतकर्‍यांना एफआरपी न मिळूनही कारखान्याला ऊस घातला. कर्मचार्‍यांना पगार नसूनही काम केले. त्यांनी हे फक्‍त संस्थेसाठीच केले. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, असेही आ. पाटील म्हणाले. यावेळी खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, बाळासाहेब सोळस्कर यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रमोद शिंदे यांनी प्रास्तविक केले.

कार्यक्रमास खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, किसनवीरचे संचालक शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, खंडाळ्याचे संचालक चंद्रकांत ढमाळ, दत्तात्रय ढमाळ, अशोक गाढवे, नितीन भुरगुडे-पाटील, विष्णु तळेकर, रमेश धायगुडे, ज्ञानेश्वर भोसले, साहेबराव कदम, हणमंतराव साळुंखे, प्र. कार्यकारी संचालक अशोक शिंदे, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button