मारूल हवेली : धनंजय जगताप पाटणचे आ. शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्ल्यात मल्हारपेठ येथे युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रा सभेने शिवसेनेत चैतन्य निर्माण झाले आहे. सभेसाठी जमलेली अलोट गर्दी, बंडखोरांबद्दल शिवसैनिकात असलेली तीव्र चीड, आदित्य ठाकरे यांची भावनिक साद आणि त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अशा वातावरणातील सभेने सर्वांचे लक्ष वेधले.
शिवसेनेत झालेली फूट आणि या सभेनिमित्ताने शिवसेनेने केलेले शक्तिप्रदर्शन आगामी निवडणुकीची समीकरणे बदलवणारी असल्याने पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभेला शिवसैनिक कुणाला धक्का देणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मल्हारपेठ येथील सभेसाठी आदित्य ठाकरे आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत झाले. ठाकरे यांनी थेट जनतेत मिसळून शिवसैनिकांच्यात चैतन्य निर्माण केले. खुल्या व्यासपीठावरून संवाद साधला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी घोषणा देत आदित्य ठाकरे यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. उपस्थित शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद पाहून आदित्य ठाकरे यांनी मला तुमचं प्रेम आणि आशिर्वाद हवेत, तुम्ही देणार ना? अशी भावनिक साद घातली. यावेळी शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबाद… आदित्य ठाकरे तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.. बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो.. अशा घोषणांना परिसर दणाणून सोडला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी हात उंचावून 'साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत' असा भक्कम धीर दिला.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी तुम्हा सर्वांचे प्रेम, आशिर्वाद हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. त्यामुळे ठाकरे परिवाराला कुणीच संपवू शकत नाही. त्या 40 गद्दारांनी हिंमत असेल तर राजीनामा देवून निवडणुकीला सामोरे जावे, त्यावेळी कळेल सत्य जिंकते की सत्ता?मल्हारपेठ येथील या निष्ठा यात्रेकरिता मंगळवारी आदित्य ठाकरे वाहनाने निसरे फाटा येथे दाखल झाले. त्यानंतर रॅली काढून ते मल्हारपेठच्या दिशेने मार्गस्थ झाले. मल्हारपेठ येथील मध्यवर्ती चौकात सभेचे शिवसैनिकांनी नियोजन केले होते. शिवसेनेच्या या कठीण काळात कराड, पाटण तालुक्याच्या विविध विभागातून उत्स्फूर्तपणे शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शविली होती. नियोजित वेळेपेक्षा आदित्य ठाकरे दोन तास उशिरा सभास्थळी पोहचले. तरीसुध्दा उपस्थित शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसून आले. मल्हारपेठ येथे प्रथमच एवढ्या उत्साहात त्यांचे स्वागत झाले. आदित्य ठाकरे यावेळी ठाकरे यांनी जय महाराष्ट्र करताच उपस्थित शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आदित्य ठाकरेंनी आपल्या खास ठाकरे शैलीत 40 गद्दारांचा खरपूस समाचार घेतला. हे बेईमानीचे गद्दारांचे सरकार आहे, हे सरकार कोसळणारच. असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आपला महाराष्ट्र गद्दारी कधीही खपवून घेत नाही असे ठाकरे म्हणताच उपस्थित शिवसैनिकांनी या गद्दारांचं करायचं काय.. खाली डोकं वर पाय.. अशा घोषणा सुरू करून एक प्रकारे गद्दारांविरोधात रोष व्यक्त केला. आजचे हे घाणेरडे राजकारण तुम्हाला आवडते का? ही महाराष्ट्राची ओळख आहे का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. शिवसैनिकांनी सुध्दा त्याच ताकदीने नाही, नाही असे उत्तर देत शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या कठीण काळात तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशिर्वाद आम्हाला द्या अशी आर्त हाक आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शेकडो शिवसैनिकांना दिली.जिल्हाप्रमुख हर्षद कदम, त्यांचे सहकारी व शिवसैनिकांनी या सभेचे नियोजन केले होते.
ही सभा उद्धव ठाकरे व शिवसेना यांच्या प्रेमापोटी उसळलेला प्रतिसाद होता. अनपेक्षित गर्दी पाहून काहींना पोटशूळ उठला आहे. सभेला जमलेला शिवसैनिक हा पेटून उठला आहे. पायाखालची वाळू सरकल्याने आता काहीजण नाहक टिका करत आहेत. त्याला महत्व नाही, तर निष्ठेला आहे.
– हर्षल कदम
जिल्हा प्रमुख- शिवसेना