पुनर्वसनाच्या प्रश्‍नांना प्राधान्य : रुचेश जयवंशी | पुढारी

पुनर्वसनाच्या प्रश्‍नांना प्राधान्य : रुचेश जयवंशी

सातारा : पुढारी वृत्‍तसेवा सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला माझे सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. या कामात संपूर्ण जिल्हा प्रशासन झोकून देऊन काम करेल, अशी माहिती सातार्‍याचे नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जे प्रकल्प राबवले ते पूर्णत्वाला नेले जातील. पर्यटनाच्या प्रकल्पांना पूर्णत्वाला नेऊन सातारा जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली जाईल, अशी ग्वाहीही जयवंशी यांनी दिली. जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली. सातारा जिल्ह्याच्या प्रलंबित विकासकामांबाबत व संभाव्य उपाययोजनांबाबत त्यांनी पत्रकारांकडून माहिती घेतली.

जिल्ह्यात कामाच्या अनुषंगाने कोणती आव्हाने आहेत, असे विचारले असता रुचेश जयवंशी म्हणाले, पुनर्वसनाचे आव्हान वाटते. पुनर्वसन अनेकांचे राहिले असून त्यांची संख्या मोठी आहे. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भातील संकलनाचे काम हाती घेतले आहे. किती जणांचे पुनर्वसन कोणकोणत्या ठिकाणी झाले याबाबत अहवाल आल्यानंतर त्यावर काम करता येईल. काही ठिकाणी पुनर्वसन झाले आहे. त्यांनाही अडचणी आहेत. जमिनी देण्यात आल्या पण मालकी हक्‍क मिळालेला नाही. त्यामुळे पुनर्वसित झालेल्या गावांना मालकी हक्‍क मिळवून देण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. खिरखंडीतील पुनर्वसन प्रश्‍नाबाबत विचारले असता रुचेश जयवंशी म्हणाले, त्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाताना संघर्ष करावा लागतो. त्याठिकाणी विश्‍वास निर्माण करावा लागतो याची कल्पना आहे. त्याच ठिकाणी जमिनी द्यायच्या ही मागणी असली तरी इतर लोक त्याठिकाणी पुनर्वसित झाली आहेत. प्रत्येक ठिकाणी गावठाण विस्ताराची मागणी आहे.

दुसर्‍या जिल्ह्यातही अशीच अडचण येवू शकते. खिरखंडीतील नागरिकांनी काही अडचणी सांगितलेल्या आहेत. ज्या ठिकाणी पुनर्वसन झाले त्याठिकाणी सुविधा मिळण्यासाठी हक्‍काने मागणी करु शकता. पायाभूत सुविधा त्याठिकाणी मिळाल्याच पाहिजेत. याच जिल्ह्यात पुनर्वसन करण्याची मागणी असेल तर एकाच ठिकाणी तेवढी जागा उपलब्ध झाली नाही तर प्रश्‍न कसा सुटणार? सर्व नागरिक सोबतच जाणार ही त्यांची अट आहे. या भागातील मुलांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. उपाययोजना करण्यासंदर्भात प्रयत्न केले आहेत. बामणोली, अंधारी परिसरात शिक्षणासाठी जाणार्‍या मुलांना त्याच ठिकाणी समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेत दाखल केले आहे. त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ही सुविधा त्यांना दिली जाईल.

वैयक्‍तिक लक्ष दिले जात आहे. शाळा गणवेश, राहण्याची तसेच जेवणाची सुविधा त्यांना आहे. या आश्रमशाळेत त्या मुलांना प्रवेश मिळणे अशक्य होते. पण आदेश काढून त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली ही बाब माझ्यासाठी खूप समाधानाची आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यात येणार आहे. लहान मुले जीव मुठीत घेवून खोल पाण्यातून प्रवास करत होते. या दुर्गम खोर्‍यातील रस्ते आणि कोयना बॅकवॉटरच्या खोल प्रवासाचा मुख्य कार्यक़ारी अधिकारी यांच्यासोबत स्वत: घेतलेला थरारक अनुभवही रुचेश जयवंशी यांनी यावेळी कथन केला. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील काही गावे धोकादायक स्थितीत आहेत. त्या गावांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अशा गावांना मदत पोहोचवण्याबाबत प्राधान्य दिले जाईल.

मुख्यमंत्री याच जिल्ह्याचे असल्याने जिल्ह्याचा विकास व्हावा, अशी जिल्हावासियांची अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासनानेही भूमिका बजवावी, असे सांगितले असता रुचेश जयवंशी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनीही जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. कुणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. महाबळेश्‍वर आणि कास पठार रस्त्याने जोडले जाणार आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने सातारा जिल्हा महत्वाचा आहे. अजिंक्यतारा तसेच प्रतापगड किल्‍ला हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यादृष्टीने या किल्ल्यांचा विकास केला जाईल. पूर्वी जी चांगली कामे होती ती कुठेही थांबणार नाहीत. छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये जम्बो कोविड हॉस्पिटल सुरु होते. कोरोना संसर्ग प्रमाण कमी-जास्त होत होते. त्यामुळे हे संग्रहालय ताब्यात ठेवणे ही गरज होती. संग्रहालयाची पाहणी करुन हस्तारणासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असेही जयवंशी म्हणाले.

सातारा शहराबरोबरच तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या माध्यमातून महिलांसाठी स्वच्छता गृहे बांधण्याबाबत सूचना केल्या जातील. महाबळेश्‍वर, पाचगणी, कास पठाराबरोबरच जिल्ह्याच्या इतर तालुक्यांचाही विकास करण्यावर भर राहिल. एमटीडीसीचे कार्यालय सातार्‍यात झाले पाहिजे. जिल्ह्याला नैसर्गिक संपन्नता लाभली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासनही रुचेश जयवंशी यांनी दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी नीता शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी दत्‍ता कोकरे आदि उपस्थित होते.

संवाद साधण्यावर भर…

जिल्ह्यातील माध्यमांशी माझा सातत्याने संवाद राहील. संवाद साधण्यावर माझा भर राहील. शासन, प्रशासन व माध्यमे मिळून बरेच काही करू शकतात यावर माझा विश्‍वास आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या प्रक्रियेत तुम्हाला सोबत घेऊन काम करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले. मुख्यमंत्री आता सातारा जिल्ह्याचे आहेत. त्यांच्याकडून सातारा जिल्हावासीयांना प्रचंड अपेक्षा आहेत. जिल्ह्याच्या प्रलंबित विकासाचा आराखडा तयार करून मुख्यमंत्र्यांंंंंंंकडे सादर करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी म्हणून आपणाकडे आहे. या प्रक्रियेत आपण कमी पडू नका. माध्यमांचे तुम्हाला सहकार्य राहील. मात्र, अमूक एका तालुक्याकडे फोकस म्हणून न पाहता अकराही तालुक्यांच्या प्रलंबित विकासकामांकडे आपण फोकस करावा. माध्यमे म्हणून आम्ही लोकांचे प्रश्‍न मांडत राहू, आपण सकारात्मक राहून उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी व्यक्‍त केली.

Back to top button