कातरखटाव मध्ये चोरट्यांनी एका रात्रीत पाच दुकाने फोडली | पुढारी

कातरखटाव मध्ये चोरट्यांनी एका रात्रीत पाच दुकाने फोडली

कातरखटाव : पुढारी वृत्तसेवा

कातरखटाव (ता. खटाव) येथील भरचौकात ग्रामपंचायतीला लागून असलेली पाच दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. सुमारे 33 हजार 200 रुपयांचा सोने-चांदीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मिरज-भिगवण राज्य महामार्गावरील सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या कातरखटाव येथील ग्रामपंचायत परिसरातील महालक्ष्मी हार्डवेअर, श्री राम ज्वेलर्स, प्रियांका ज्वेलर्स, सतीश ज्वेलर्स आदींसह एका देशी दारूच्या दुकानांत मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये तरसवाडी गावचे रहिवासी असलेले दत्तात्रय पवार यांच्या कातरखटाव येथील श्रीराम ज्वेलर्सचे शटर उचकटून 320 ग्रॅमचे पैंजण, चार ग्रॅम सोने असा एकूण 31 हजार 200 रुपयांचा ऐवज लंपास केला.

तसेच सतीश ज्वेलर्स यांच्या दुकानाची कडी तोडून गळ्यातील ताईतपेटी, चांदीच्या राख्या व चांदीच्या लहान देवाच्या 50 पट्ट्या असा एकूण 2 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच महालक्ष्मी हार्डवेरचे शटर उचकटून ड्रॉव्हरमधील एक हजार रुपये रोख व किरकोळ साहित्य चोरून नेले. चोरट्यांनी प्रियांका ज्वेलर्स या दुकानाकडे मोर्चा वळवला. या दुकानाचे शटर उचकटून आतील लोखंडी ग्रीलचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना तो न तुटल्याने त्यांनी नरवणे रस्त्यावरील एका देशी दारुच्या दुकानाकडे आपला मोर्चा वळवला.

दारुच्या दुकानाचे शटर उचकटून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. चोरट्यांनी एकूण पाच दुकाने फोडून सुमारे 33 हजार 200 रुपयांचे चांदी व सोन्याचे दागीने लंपास केले. या घटनेची वडूज पोलिस ठाण्यात नोंद झाली असून तपास सपोनि मालोजीराजे देशमुख करत आहेत.

Back to top button