सातारा : जलसंधारणचा कार्यकारी अभियंता ‘जाळ्यात’ | पुढारी

सातारा : जलसंधारणचा कार्यकारी अभियंता ‘जाळ्यात’

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : कंत्राटदाराने केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी 2 टक्क्यांप्रमाणे 92 हजार रुपयांची लाच मागून ती लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) सतीश लब्बा या जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला (क्लास वन) रंगेहाथ पकडले. दरम्यान, या कारवाईने पाटबंधारे विभागाचा बुरखा फाटला असून यामध्ये आणखी काही मासे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सतीश पंचाप्पा लब्बा (वय 48, सध्या रा. सदरबझार, सातारा मूळ रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव असून तो जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी (वर्ग 1) चा अधिकारी आहे. या प्रकरणातील तक्रारदार 54 वर्षीय कंत्राटदार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांनी मृदा व जलसंधारण विभागाचे काम केले आहे. त्या कामाचे बिल काढायचे असल्याने ते संशयित सतीश लब्बा याला दि. 28 जुलै रोजी भेटले. संबंधित कामासाठी लब्बा याने 2 टक्केप्रमाणे 92 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी एसीबी विभागात जावून पोनि विक्रम पवार यांच्याकडे तक्रार दिली. एसीबी विभागाने तक्रार घेवून पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.

लाचेची रक्कम दि. 2 रोजी स्वीकारणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीचे पोनि सचिन राऊत यांनी कर्मचार्‍यांसह सापळा लावला. संशयित सतीश लब्बा याने लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबी विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी त्याला रंगेहाथ पकडले. क्लास वन अधिकारी ट्रॅपमध्ये सापडल्याचे समोर आल्यानंतर सातार्‍यातील शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली. एसीबी विभागाने घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयित लब्बा याला ताब्यात घेतले. रात्री उशीरा त्याला अटक करण्यात आली असून बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवहन करण्यात आले आहे.

कृष्णानगर कार्यालयात स्वीकारले पैसे

मंगळवारी लाचेची रक्कम स्वीकारणार असल्याचे समोर आल्यानंतर एसीबी कृष्णानगर परिसरात जाळे टाकून थांबले होते. सकाळपासून दुपारपर्यंत कोणतीही हालचाल झाली नाही. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मात्र लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबी विभागाने लब्बा याला पकडले. ही कारवाई होताच पाटबंधारे कार्यालय हडबडून गेले. यावेळी अनेकांना घाम फुटला.

46 लाखाचे होते बंधार्‍यांचे बिल

तक्रारदार यांनी लहान- मोठे 46 लाख रुपयांचे बंधारे बांधले आहेत. ते बांधून झाल्यानंतर रक्कम घेण्यासाठी ते या विभागाच्या चकरा मारत होते. सुरुवातीला लाचेची रक्कम 82 हजार रुपयांची ठरली होती. मात्र, 46 लाखांप्रमाणे 92 हजार होत असल्याने ऐनवेळी संशयिताने तो आकडा टाकला. यामुळेच एसीबीची पडताळणी फिक्स झाली. मागणीनंतर 4 दिवस गेल्यानंतर अखेर लाचेची रक्कम मंगळवारी स्वीकारताच एसीबीने रेड हॅन्ड कारवाई केली. दरम्यान, लाचेची रक्कम लाखात गेल्याने यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास एसीबी करत आहेत.

मृद व जलसंधारण कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करा : मोतलिंग

जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव बांधले जातात. जलयुक्त शिवार योजनेतून सिमेंट बंधारे बांधण्यात आले. गाव पातळीवरुन तक्रारी येत असल्यामुळे माहिती अधिकारात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकार्‍यांनी माहिती लपवली. गाववार केलेल्या कामांची तपासणी करुन वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पुराव्यासहित तक्रारी केल्या. मृद व जलसंधारण विभागात लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईने बहुजन मुक्ती पार्टीच्या लढ्याला यश आले आहे. या कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचाराची वरिष्ठ अधिकार्‍यांनी सखोल चौकशी न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार, असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तुषार मोतलिंग यांनी दिला.

Back to top button