सातारा : ओबीसी आरक्षणामुळे मातब्बरांचा लोचा | पुढारी

सातारा : ओबीसी आरक्षणामुळे मातब्बरांचा लोचा

कण्हेर : बाळू मोरे : सातारा तालुक्यातील लक्षवेधक असलेल्या कोंडवे गटाचे आरक्षण ओबीसी पडल्यामुळे दोन्ही राजेंच्या मातब्बर इच्छुकांचा लोचा झाला आहे. माजी सभापती धर्मराज घोरपडे, युवा नेते बाळासाहेब चोरगे, महेश गाडे, संदीपभाऊ शिंदे, नामदेवराव सावंत, अरुण पवार आदींना रिंगणाबाहेर राहण्याची वेळ आली आहे. तर माजी जि. प. सदस्य प्रतीक कदम यांना पुन्हा लॉटरी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोंडवे गट व त्यामधील कोंडवे व जकातवाडी या दोन्ही गणांमध्ये ओबीसी असे एकच आरक्षण पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नव्या रचनेत कोंडवे गटात सुमारे 22 गावे समाविष्ट करण्यात आली. या गट व गणांमध्ये ओबीसी आरक्षण पडल्याने मातब्बर इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. गट व गणांसाठी ओबीसी उमेदवारांची निवड करताना दोन्ही राजेंचा कस लागणार आहे. गटातील कोंडवे, कण्हेर, जकातवाडी, सारखळ, नुने, वेळेकामटी या ठराविकच गावांमध्ये ओबीसी प्रवर्ग पहायला मिळत आहे. कोंडवे गटासाठी माजी जि. प. सदस्य प्रतीक कदम यांचे नाव पुढे येत आहे. तर गट व गणासाठी राहुल काळे, निलेश भुजबळ, राहुल दळवी, पराग भुजबळ, संतोष चौगुले, जीवन जंगम, गणेश पवार, अशोक चांगण, मंगेश बनकर, पंडित राठोड, जावेद पठाण, किरण भुजबळ, दीपक देशमुख, राहुल घाडगे, तानाजी जाधव आदी इच्छुक उमेदवारांची नावे पुढे येत आहेत.

येथील लढती दोन्ही राजेंच्या गटातच होणार आहे. आरक्षणामुळे दिग्गजांचा पत्ता कट झाला असून येथे नव्या चेहर्‍यांना संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे युवा कार्यकर्त्यालाही लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

उमेदवार निवडीमध्ये राजांचे मातब्बर व खंदे समर्थक नेत्यांचीही भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. नव्या रचनेने आणि आरक्षणाने बरेच राजकीय उलटफेर झाले आहेत. यामुळे नव्या चेहर्‍यांना निवडून आणण्यासाठी राजेंच्या कार्यकर्त्यांना बरीच कसरत करावी लागणार आहे. आरक्षण सोडतीने मातब्बरांना झटका दिल्याने काहींची राजकीय कारकिर्द थांबण्याची वेळ आली आहे.

नव्या चेहर्‍यांना चांगली संधी…

गट व गणामध्ये ठराविक गावातच ओबीसी समाजबांधव असून ते राजकारणात म्हणावे असे सक्रिय नसल्याचे चित्र आहे. हातावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते सार्वजनिक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. त्यामुळे नव्या चेहर्‍यांना चांगली संधी आहे. कोंडवे गटासाठी आ.शिवेंद्रराजे यांच्याकडून युवा नेते प्रतीक कदम आघाडीवर आहेत. ते माजी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे प्राधान्याने त्यांचे नाव पुढे येत आहे.

Back to top button