सातारा : चुकीच्या धोरणामुळे ‘खासगी’स प्रोत्साहन | पुढारी

सातारा : चुकीच्या धोरणामुळे ‘खासगी’स प्रोत्साहन

ढेबेवाडी;  विठ्ठल चव्हाण :  ज्या शाळेवर शिक्षक कमी आहेत, जिथे तक्रारी आहेत. तिथे फेरबदल करण्याचे अधिकार कुणालाच नाहीत. शिक्षक बदल्यांचे अधिकार जिल्हा परिषदेला असले तरी ते शासन धोरणानुसार आहेत. शाळा सुरू होऊनही शासन धोरण अंमलात आणण्याचे हे गुर्‍हाळ सुरूच आहे. त्यामुळेच ग्रामीण शिक्षणाची वाट लावण्याचे व खासगी शाळांना प्रोत्साहन देण्याचे काम शासन करीत आहे, असा संशय निर्माण होऊ लागला आहे.

शिक्षक बदल्यांबाबत शासनाने चार संवर्ग तयार केले आहेत. त्यानुसार जिल्हा बाह्य, आंतर जिल्हा, दिव्यांग, विधवा, कुमारिका, 53 वर्षांवरील पती-पत्नी एकत्रीकरण, सुगम – दुर्गम, एकाच शाळेत 3 ते 5 वर्षे पूर्ण झालेले असे गट पाडले आहेत. संपूर्ण राज्याचा डेटा एकत्रीत झाल्यानंतर जिल्हावार, बदल्या असा सर्व साधारण डेटा आहे. शाळा सुरू होऊन आता दीड महिने झाले; पण अजून तो डेटा काय पूर्ण होत नाही, असे दिसते. त्याला काही कालमर्यादा आहे की नाही? हा प्रश्‍न मात्र निर्माण झाला आहे.

खरेतर जूनमध्ये शाळा सुरू होतात, तोपर्यंत हा डेटा जिल्हा पातळीवर यायलाच हवा. जूनपूर्वी त्याची अंमलबजावणी व्हायला हवी, पण सध्या जे चाललय ते समजण्या पलीकडचे आहे. सातारा जिल्ह्यात काही शाळांची अवस्था दयनीय आहे. कराड तालुक्यात 304 जिल्हा परिषद शाळा आहेत. तिथे किमान 1 हजार 139 शिक्षकांची गरज आहे. प्रत्यक्ष 972 शिक्षक आहेत.24 केंद्र प्रमुखांची गरज असताना केवळ 5 केंद्र प्रमुख आहेत. तर 56 मुख्याध्यापक आवश्यक असताना केवळ 19 आहेत. आठ विस्तार अधिकारी आवश्यक असताना प्रत्यक्ष उपलब्ध तीन आहेत. पाटण तालुक्यात यापेक्षा वेगळे काही चित्र नाही. डोंगर व दर्‍याखोर्‍याने वेढलेल्या पाटण तालुक्यात 527 शाळा आहेत. तालुक्यात 226 शिक्षक, 36 केंद्रप्रमुख, 7 शिक्षणविस्तार अधिकारी इतकी पदे रिक्त आहेत. या शाळेत प्रत्यक्ष काय दर्जाचे शिक्षण मिळत असेल? या पिढ्यांचे भविष्य काय असेल? याबाबत कुणी फारसे गांभीर्याने लक्ष देतय अस दिसत नाही. शिक्षण क्षेत्राची यापेक्षा वाईट दुसरी शोकांतिका काय असू शकते?

शाळा बंद पडण्याचा धोका वाढला…
पालकांनी प्रशासनाच्या मनाप्रमाणे वागावे, अशी जिल्हा परिषदेची अपेक्षा आहे काय? जिल्हा परिषद शाळेतून आपल्या पाल्याला काढून अन्य शाळेत प्रवेश घेण्यार्‍या पालकांची संख्या वाढत आहे. परिणामी शाळा किंवा काही वर्ग बंद पडण्याचा धोका वाढतोय. त्यामुळे याला जबाबदार कोण? या प्रश्‍नाचे उत्तर द्यायला सध्यातरी कुणीच तयार नाही.

Back to top button