सातारा : बाप्पांच्या स्वागतासाठी आतापासूनच ‘आवाज’ | पुढारी

सातारा : बाप्पांच्या स्वागतासाठी आतापासूनच ‘आवाज’

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  कोरोनानंतर आता पुन्हा एकदा ढोल-ताशांचा गजर पुन्हा दुमदुमू लागला आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर ढोल-ताशा, झांज पथके तयारीला लागली आहेत. शहरानजीकच्या अनेक माळरानांवर पथकांचा सराव सुरू झाला आहे. नव्याने शिकण्यास येणार्‍या मुलांची संख्या वाढत असून, त्यामध्ये मुलींची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे यंदा गणेश मिरवणुकीमध्ये ढोलांची झिंग व ताशांचा तर्रर्र आवाज आबालवृद्धांना ठेका धरायला लावणार आहे.

गणेशोत्सव म्हटला की, ढोल-ताशांचा दणदणाट हे समीकरण आहे. ढोलांची झिंग अनुभवायची असेल, तर ढोल वाजवणे महत्त्वाचे असल्याचे जाणकार सांगतात. सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ढोल-ताशा संस्कृती रुजत आहे. शहर व परिसरात अनेक पथके आहेत.

एका पथकात ढोल, ताशा, झांज, शंख अशी विविध वाद्ये वाजवणारी 50 ते 150 हून अधिक वादक सहभागी असतात. त्यामुळे या कालावधीत मोठी उलाढालही होत असते. मात्र 2019 मधील पूरग्रस्त परिस्थिती तर 2020 व 2021 ही दोन वर्षे कोरोना निर्बंधात गेली. या तीन वर्षांचा मोठा परिणाम वादकांच्या उत्पन्नावर झाला. यंदा गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटवल्याने तीन वर्षांची मरगळ झटकून पथके तयारीला लागली आहेत. दररोज तीन ते चार तास सराव ही पथके करत आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्याची धून ऐकण्यास मिळणार हे निश्‍चित आहे.

शहरात ढोल -ताशे पथके व लेझीम पथके आहेत. यामधील एका पथकामध्ये सुमारे 100 ते 150 तरुण मुले, मुली वादकांचे काम करतात. एका पथकामध्ये सरासरी 50 ते 80 हून अधिक ढोल आहेत. मात्र, तीन वर्षे ढोल वापरत नसल्याने चमडी, दोरी खराब झाली आहे. त्यामुळे पथकामधील अधिक तर साहित्यास दुरुस्तीची आवश्यकता आहे. पथकांना पुन्हा सुरुवात करावी लागत असून, दुरुस्तीसाठी लाखो रुपये उभा करावे लागत आहेत.

कोरोनामुळे ढोल पथकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 60 हून अधिक ढोलांना दुरुस्तीची आवश्यकता लागली. यंदा सर्व निर्बंध हटवल्याने मुलांमध्ये जोश दिसत आहे. यामधून मिळणार्‍या उत्पन्नापैकी काही रक्कम सामाजिक कार्यास वापरत आहे. त्यामुळे निर्बंधमुक्त उत्सव आवश्यक आहे.
-शिवराज ओंबळे, गंधतारा ढोल पथक

Back to top button