सातारा : तारूखमध्ये बिबट्याकडून दोन शेळ्या फस्त | पुढारी

सातारा : तारूखमध्ये बिबट्याकडून दोन शेळ्या फस्त

ढेबेवाडी;  पुढारी वृत्तसेवा :  तारूख (ता. कराड) येथे भरवस्तीत घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या असून मागील तीन दिवसात पाळीव प्राण्यावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. त्यामुळेच तारूख, कुसूर, कोळेवाडी परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली असून वनविभागांकडून याबाबत ठोस पावले उचलून बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तारूख येथील बौध्द वसाहतीतील सुशिला आनंदा सागरे यांनी त्यांच्या घरासमोरील खुल्या शेडमध्ये एक म्हैस व दोन शेळ्या बांधल्या होत्या. रात्र उशिरा कधीतरी बिबट्याने शेडात घुसून त्या शेळ्यांवर हल्ला करून दोन्ही शेळ्या ठार मारल्या. त्यापैकी एक शेळी शेडपासून दूर नेऊन तिचा फडशा पाडला. तर दुसरी मृत शेळी नरडे फोडलेल्या अवस्थेत शेडमध्येच होती. तारूखचे पोलीस पाटील सतीश भिसे, दत्ता गुरव यांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनपाल बाबुराव कदम यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली.

तारूख, कुसूरसह परिसरातील वाडीवस्तीच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. उसाच्या शेतीत वैरण काढताना वाकून काढू नका. जनावरे बंदिस्त जागेत बांधा. तसेच शेतकर्‍यांसह ग्रामस्थांनी काळजी घ्यावी.
– बाबुराव कदम,
वनपाल, कोळे वनक्षेत्र.

दहा महिने झाले तरी भरपाई नाहीच
वन्य प्राण्यांनी पाळीव जनावरे ठार मारणे, शेतात घूसून पिकांची नासधुस करून नुकसान करणे अशा घटना सतत घडतात. वनविभाग घटनेचे पंचनामे करते. शेतकरी सुद्धा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नियमानुसार असणारी सर्व कार्यवाही करतात. मात्र त्यानंतरही 10 महिने उलटले तरी वनविभागाकडून भरपाई मात्र मिळत नाही.

Back to top button