सातार्‍यात युवकाचा खून | पुढारी

सातार्‍यात युवकाचा खून

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरामध्ये एका युवकाचा खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर मृत युवकाचे हात-पाय बांधून ठेवण्यात आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात खूनप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर व्हिसेरा पुण्याला पाठवण्यात आला आहे.

संदीप दबडे (वय 30) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार नितीन घोडके यांनी फिर्याद दिली आहे. तालिम संघ परिसरात संदीप हा एकटाच राहत होता. त्याचे नातेवाईक पिलाणी, ता. सातारा येथे राहतात. काही कारणास्तव त्याचे नातेवाईक त्याच्याकडे येत नव्हते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तो कोणालाच दिसला नव्हता.

शनिवारी सकाळी दबडे याच्या घराशेजारील लोकांना त्याच्या घरातून दुर्गंधी येवू लागली. यामुळे नागरिकांनी तत्काळ याबाबतची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संदीपच्या घराचा दरवाजा उघडला असता त्याचा मृतदेह आढळून आला.

त्याचा मृतदेह हा हात-पाय बांधलेल्या अवस्थेत होता. तर तोंडात बोळा कोंबल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शेजारी असणार्‍या लोकांकडे चौकशी केली. यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला.

दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सर्व शासकीय सोपस्कार पार पाडले. यानंतर दुपारी 2 च्या सुमारास मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. तब्बल पाच तास या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते.शवविच्छेदन करणार्‍या कर्मचार्‍यांनी 7 ठिकाणाचा व्हिसेरा काढला असून तो पुण्याला पाठवण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल पोलिसांना मिळाला नाही. हा अहवाल प्राप्‍त झाल्यानंतरच अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

Back to top button