सातारा : सिव्हीलमध्ये 4 वर्षात 6292 जणांना ‘दृष्टी’ | पुढारी

सातारा : सिव्हीलमध्ये 4 वर्षात 6292 जणांना ‘दृष्टी’

सातारा : विशाल गुजर वृध्दत्वाकडे गेलेल्यांची दृष्टी वयानुसार धूसर होते. अशाप्रकारे अंधत्व आल्यासारखी स्थिती अनुभवणार्‍या तब्बल 6 हजार 292 जणांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय दृष्टिदाता ठरले आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर धूसर बनलेली दृष्टी या सर्व वयोवृद्धांना नव्याने मिळाली आहे. वयोमानानुसार मधुमेह, हृदयविकार, मोतीबिंदू असे एक ना अनेक आजार वृध्दांना जडतात. तेव्हा या सार्‍या आजारांचा सामना करण्यासाठी त्यांना खरी गरज भासते ती पैशाची. कमी पैशांमध्ये कुठे शस्त्रक्रिया करून मिळेल का? यासाठी वृद्धांची फरपट होते. आयुष्यभर कमावलेली रक्कम कुटुंबातच खर्च झालेली असते. त्यामुळे स्वतःच्या आजारपणासाठी स्वतःजवळ एक कवडीही नसते.

अशावेळी मग जिल्हा शासकीय रुग्णालय हेच त्यांच्यासाठी तारणहार ठरतेय. कोरोनामुळे दोन वर्षे जिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया बंद होत्या. त्यामुळे सध्या या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात वेटिंग लिस्ट लागली आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये 15 ते 35 हजार रुपये खर्च सांगितला जातो. तर, हीच शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात मोफत होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार्‍यांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. चंद्रकांत काटकर, डॉ. धनंजय भोसले आणि त्यांचे सहकारी एका दिवसात दहा शस्त्रक्रिया करत आहेत. एकही दिवस सुट्टी न घेता ही टीम सर्वसामान्यांची धूसर असलेली दृष्टी पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहे. या टीमने साडेचार वर्षात 6 हजार 292 मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत.

वयोवृध्दांच्या चेहर्‍यावरचे भाव हेच सर्टिफिकेट
जिल्हा शासकीय रुग्णालय गोरगरिबांसाठी नेहमीच आरोग्यमंदिर ठरले आहे. या रुग्णालयात अनेकांना नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी रुग्णसेवा करताना सेवाभावी वृत्ती जोपासली. वयोवृध्दांना नवी दृष्टी बहाल केल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर उमटलेले भाव हेच आमचे सर्टिफिकेट असल्याची भावना शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांनी व्यक्‍त केली आहे.

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर वयोवृद्धांना पूर्वीपेक्षा स्पष्ट दिसू लागते. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून रुग्णालयातील डॉक्टरही गहिवरून जातात. आमच्या हातून अत्यंत चांगलं काम होतेय, याचा आम्हाला अभिमान आहे. सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे परवडणारे नाही.

-डॉ. चंद्रकांत काटकर,
नेत्रचिकित्सक

Back to top button