

सातारा : ना. शिवेंद्रराजे यांच्या सूचनेनुसार किल्ले अजिंक्यतारा, माहुली येथील महाराणी ताराराणी समाधी परिसर आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी ना. शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रराजे यांच्या मागणीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस ना. शिवेंद्रराजे, ना. नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, वित्त आणि पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्प सल्लागार उपस्थित होते.
बैठकीत राज्यातील या तीन ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांच्या सुशोभीकरण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या कामांसाठी एकूण 358.89 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. माहुली (सातारा) येथील ताराराणी समाधी सुशोभीकरणासाठी 133 कोटी रुपये तर किल्ले अजिंक्यतारा सुशोभीकरणासाठी 135 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी 90.89 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
बैठकीदरम्यान या प्रकल्पांच्या आराखड्यांबाबत, सुविधा विकास, सांस्कृतिक वारसा जतन आणि स्थानिक पर्यटनविकासाच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान या प्रकल्पांच्या आराखड्यांबाबत, सुविधा विकास, सांस्कृतिक वारसा जतन आणि स्थानिक पर्यटनविकासाच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या निर्णयामुळे ऐतिहासिक स्थळांचे सौंदर्यवर्धन, पर्यटनाला चालना, स्थानिक अर्थव्यवस्थेला गती आणि सांस्कृतिक अभिमान वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कामांना निधी मंजूर केल्याबद्दल ना. शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, तातडीने शासकीय सोपस्कार पूर्ण करा, तीनही कामे वेळेत सुरु करा, सर्व कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, अशा सूचना ना. शिवेंद्रराजे यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या आहेत.
ना. अजितदादा, ना. शिवेंद्रराजेंना धन्यवाद : राजेंद्र चोरगे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मे 2025 मध्ये कृष्णा-वेण्णा नदीच्या संगमावर घाटाचा विकास करणे, पूल बांधणे, समाधी विकसित करणे, यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन समक्ष भेट देऊन दिला होता. हाच प्रस्ताव ना. शिवेंद्रराजे भोसले यांनाही सादर केला होता. त्या अनुषंगाने ना. अजितदादा पवार यांनी 130 कोटी रुपये संगममाहुली येथील घाटाच्या विकासासाठी मंजूर केले. त्याबद्दल ना. अजितदादा पवार, बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना सातारकर, संगम माहुली ग्रामस्थ आणि बालाजी ट्रस्टच्या वतीने धन्यवाद, अशी प्रतिक्रिया राजेंद्र चोरगे यांनी दिली आहे.