करंजेत 15 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या | पुढारी

करंजेत 15 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या

सातारा : पुढारी वृत्तसेवा येथील करंजे परिसरात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा हिवताप विभागाच्या पथकाने या परिसरातील 130 घरांना भेट देऊन डेंग्यू अळ्यांचा शोध घेतला. यावेळी 15 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. सदर बझार परिसरात 100 घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. जिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून साथ रोगांमध्ये वाढ झाली आहे. करंजे, सदरबझार, लक्ष्मी टेकडी या भागांतील अनेक नागरिक ताप, थंडी, सर्दी, अंगदुखी, सांधेदुखी अशा आजारांनी त्रस्त झाले आहेत. करंजे येथील दोन नागरिकांना डेंग्यू झाल्याचे समजताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

जिल्हा हिवताप विभागाचे आरोग्य सेवक संपत जंगम यांच्या पथकाने या पेठेत तपासणी मोहीम हाती घेतली. एकूण 130 घरांमधील पाण्याची पिंप, टाक्या, फ्रीज, भंगार या वस्तूंची पाहणी केली. यावेळी पाण्याची आठ पिंपे तातडीने रिकामी करण्यात आली तर सात पिंपांमध्ये औषध टाकून डेंग्यू अळ्या नष्ट करण्यात आल्या. त्यानंतर सदर बझार परिसरातील 100 घरांचा सर्व्हे करण्यात आला असून त्यात 4 पिंप तातडीने रिकामे करण्यात आले असून त्यातील 3 पिंपांमध्ये औषध टाकून डेंग्यू अळ्या नष्ट केल्या.

चौघांचे घेतले रक्ताचे नमुने

या परिसरातील बहुतांश नागरिकांना सांधेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. हिवताप विभागाच्या आरोग्य सेवकांकडून करंजे येथील चार नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून अनेकांना डेंग्यूची तपासणी करण्याचा सल्ला यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांकडून देण्यात आला आहे.

Back to top button