कराड : साथरोग नियंत्रणासाठी गावोगावी आरोग्य पथक | पुढारी

कराड : साथरोग नियंत्रणासाठी गावोगावी आरोग्य पथक

कराड; पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू झाल्याने साथीचे रोग पसरून आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. या पार्श्‍वभूमीवर कराड पंचायत समितीच्या वतीने साथरोग नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी गावोगावी आरोग्य पथक स्थापन करण्यात आले असून या पथकात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायत स्तरावर हे पथक कार्यरत राहील, अशी माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी दिली.
पावसाळ्यात डासांमुळे प्रामुख्याने हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, चिकुनगुनिया आदी साथरोगाचा प्रसार होतो. डासांची निर्मिती स्वच्छ तसेच साठलेल्या पाण्यात होत असल्याने पाणी व्यवस्थापन योग्य रितीने केल्यास डासांची निर्मिती होणार नाही. त्यासाठी वैयक्तीक तसेच सामूहिक उपायोजना सुचविण्यात आल्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने घरातील पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यावीत, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळला जावा, पाण्याचे साठे उदा. हौद, बॅरल, गच्चीवरील पाण्याचा टाक्या झाकून ठेवणे, निरूपयोगी टायर, आडगळ व भंगास साहित्याची विल्हेवाट लावावी, घरातील कुलर, फ्रिजचा ड्रीप पॅन आठवड्यातून एकदा स्वच्छ करावा, झोपताना मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रिम, अगरबत्तीचा वापर करावा, अशा सूचना आरोग्य पथकामार्फत घरोघरी देण्यात येणार आहेत.

गटविकास अधिकारी मीना साळुंखे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना लेखी पत्र काढले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. पथकामार्फत कार्यवाही सुरू आहे.

साथरोग नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपायोजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांचा समावेश असणारे पथक स्थापन करण्यात आले असून यामुळे तातडीने उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
-मीना साळुंखे, गटविकास अधिकारी पंचायत समिती कराड.

Back to top button