कराड : तालुक्यात गुटखा विक्री खुलेआम | पुढारी

कराड : तालुक्यात गुटखा विक्री खुलेआम

कराड; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने गुटख्याचे सुगंधित तंबाखू व सुपारीवर बंदी घातली आहे. मात्र असे असले तरी ही बंदी केवळ कागदावरच राहिली असून कराड शहराचे तालुक्यातील ग्रामीण भागात गुटखा विक्री सुरूच आहे. आर्थिक लागेबांध्यामुळे गुटखा विक्रीवर वरदहस्त असून गुटखा बंदी केवळ कागदावर राहिल्याचे धक्कादायक वास्तव तालुक्यात पाहावयास मिळते.

राज्य शासनाने सन 2012 साली संपूर्ण राज्यात गुटखा बंदी लागू केली आहे. आज गुटखा बंदीस दहा वर्ष होऊनही कराड शहराचे तालुक्यात सर्रास गुटखा विक्री सुरू असल्याचे पहावयास मिळते. गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू, सुपारी आदी पदार्थ विक्री व वापरास शासनाकडून प्रतिबंध असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही.

मागील दहा वर्षाच्या कालावधीत पोलीस प्रशासन व अन्न व औषध विभाग यांनी शेकडो कारवाया केल्या आहेत. मात्र असे असले तरी कराड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात किराणा माल दुकाने, पान टपरी या ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. किराणा माल दुकानात व पान टपरीवर कारवाईपासून वाचण्यासाठी केवळ ओळखीच्याच व नेहमीच्याच ग्राहकांना गुटखा दिला जातो. पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन यांनाही या गोष्टीची माहिती आहे. आर्थिक लागेबांधे असल्याने कारवाईच होत नसल्याची चर्चा कराड शहरासह संपूर्ण तालुक्यात सुरू असून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधिनता वाढत आहे. त्यामुळेच गुटखा बंदी केवळ कागदावरच राहिली आहे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे खरोखर गुटखाबंदी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शालेय विद्यार्थी व्यसनांच्या आहारी… पण

कायद्याने शाळा व महाविद्यालय परिसरातील 100 मीटर अंतरात पानपट्टी व तंबाखूजन्य पदार्थ विक्री सक्त मनाई आहे. मात्र असे असले तरी कराड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात या नियमांची उघडपणे पायमल्ली सुरू असताना पहावयास मिळते. कराड शहरातही महाविद्यालयीन विद्यार्थी सोडाच, पण अनेक शालेय विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेले आहेत. कोयना व कृष्णा नदीकाठी गांजा तसेच अन्य व्यसनांच्या आहारी गेलेल्यांचा मोठा राबता असतो, असेही बोलले जात असून याची सर्वाना माहिती आहे. दुर्दैवाने ठोस कारवाई होत नाही आणि पालक, शाळा गांभीर्याने पहात नाहीत.

Back to top button