खड्डेच खड्डे चोहीकडे, रस्ता गेला कुणीकडे | पुढारी

खड्डेच खड्डे चोहीकडे, रस्ता गेला कुणीकडे

खटाव : पुढारी वृत्तसेवा :  जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे पुसेगावमधील मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. गावकरी, प्रवासी आणि वाहनचालकांना तर चंद्रावर चालण्याचा अनुभव येत आहे. अनेकदा छोट्या-मोठ्या अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. खड्डेच खड्डे चोहीकडे, रस्ता गेला कुणीकडे अशी पुसेगावमधील बहुतांश रस्त्यांची स्थिती झाल्याने खराब रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
पुसेगावमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुसेगाव-वडूज रोड, सातारा-पंढरपूर राष्ट्रीय मार्गावरील डॉ. जाधव दवाखाना ते सेवागिरी मंदिर या ठिकाणच्या रस्त्यांची चाळण झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. शेकडो खड्ड्यांमधून वाट शोधताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्यांवर अर्धा ते एक फूट खोल खड्डे पडलेले असून ते सहजासहजी निदर्शनास येत नसल्याने तेथे वाहने आदळत आहेत. त्यातूनच लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत संबंधित विभागाकडून या रस्त्यांची कोणतीही डागडुजी न झाल्याचा फटका बसत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

या खड्ड्यांमधून वाहने चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून त्यांना आरोग्याच्या तक्रारीदेखील सतावू लागल्या आहेत. खड्ड्यांमध्ये वारंवार वाहने आदळत असल्याने वाहनांचेही नुकसान होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. खड्डेमय रस्त्यांवरुन शाळा, कॉलेजमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. सध्या या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्याची खोली कळत नाही. त्यामुळे सायकल, वाहनांची चाक अडकून विद्यार्थ्यांचे अपघातही होत आहेत. त्यामुळे या खड्ड्यांवर लवकरात लवकर कायमस्वरुपी उपाय शोधावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरु लागली आहे.

Back to top button