सातारा : ‘जम्बो’तील 30 व्हेंटिलेटर धूळ खात | पुढारी

सातारा : ‘जम्बो’तील 30 व्हेंटिलेटर धूळ खात

सातारा : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात कोरोना कालावधीत पीएम केअर निधीतून 40 व्हेंटिलेटर मिळाले होते. मात्र, कोरोनाच्या लाटा ओसरल्यानंतर हे व्हेंटिलेटर हॉस्पिटलमध्ये अक्षरश: धूळखात पडले आहेत. कोरोना वाढू लागल्यामुळे सध्या 10 व्हेंटिलेटर पुन्हा कार्यान्वित झाले आहेत. मात्र, अद्यापही जम्बो कोविड सेंटरमधील 30 व्हेंटिलेटर अडगळीत पडले आहेत. त्याचा गरजू रूग्णांसाठी वापर होवून संबंधितांना जीवदान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केंद्र सरकारकडून पीएम केअर निधीतून जिल्ह्याला सुरुवातीला 40 व्हेंटिलेटर मिळाले होते. यातील 10 व्हेंटिलेटर जिल्हा रुग्णालयात दिले तर 30 व्हेंटिलेटर जम्बो कोविड सेंटरमध्ये ठेवली होती. दुसरी लाट ओसरल्यानंतर जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले. त्यानंतर येथील सर्व मशिनरी व व्हेंटिलेटर आजही धूळखात पडली आहे.

कोरोना लाटेत वाढते बळी पाहून कोरोना केअर निधीतून जिल्ह्याला 40 व्हेंटिलेटर दिली. त्यामुळे अनेकांचा जीवही वाचला. यातील निम्मी यंत्रणा सध्या उपयोगात नसली तरी भविष्यात ही यंत्रणा नक्‍कीच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपयोगी पडणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत.

जम्बो कोविड सेंटरमध्ये 30 व्हेटिलेटर बंद अवस्थेत आहेत. अचानक रुग्ण वाढले तर हे जम्बो सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासन सांगत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेले 10 व्हेंटिलेटर सुरू ठेवण्यात आले आहेत. जम्बो हॉस्पिटलमध्ये बंद अवस्थेत असलेले 30 व्हेंटिलेटर सुरू करताना तंत्रज्ञ शोधावा लागणार आहे. यासाठी प्रशासनाने आतापासूनच तंत्रज्ञ शोधण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाची लाट सुरु झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

कोट्यवधींचे व्हेंटिलेटर भंगारात?
जिल्हा रूग्णालयातील वापरात असलेले 10 व्हेंटिलेटर सुरू आहेत. मात्र, जम्बोत असणारे 30 व्हेंटिलेटर हे 6 महिन्यांपासून बंद आहेत. एका व्हेंटिलेटरची किंमत 5 ते 10 लाखांच्या घरात आहे. हे व्हेंटिलेटर चालू करण्यासाठी तत्रज्ञांना बोलावण्यात येणार आहे. परंतु, त्यातील किती चालू होणार याबाबत शंका आहे. त्यामुळे जे व्हेंटिलेटर सुरू होणार नाहीत. ते भंगारात जावून लाखो रूपयांचे नुकसान होणार आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाला 10 व्हेंटिलेटर सुरू आहेत. सध्या हे व्हेंटिलेटर आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून कोरोना रुग्णांना उपयोगी पडत आहेत.
-डॉ. सुभाष चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक

Back to top button