सातारा : धक्कादायक वास्तव! प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मेणबत्तीच्या उजेडात गर्भवतींच्या प्रसुती | पुढारी

सातारा : धक्कादायक वास्तव! प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मेणबत्तीच्या उजेडात गर्भवतींच्या प्रसुती

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : खिंगर (ता. महाबळेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील अधिकार्‍यांच्या भोंगळ कारभाराने येथील आरोग्य सेविकेला चक्क अंधारात गर्भवतींच्या प्रसूती कराव्या लागत आहेत. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत खिंगर हे उपकेंद्र येत असून याठिकाणी हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथे वास्तव्यास असणार्‍या कर्मचार्‍यांनाही मेणबत्तीच्या प्रकाशात रहावे लागत आहे. या केंद्राला प्रशस्त इमारत असून गेल्या कित्येक वर्षापासून येथे कार्यरत असणार्‍या आरोग्य सेविका या आपल्या परीने सेवा पुरवत आहेत. येथे अन्य आरोग्य अधिकारी नसताना या धाडसी आरोग्य सेविकेने शेकडो प्रसूती सुखरूपपणे केल्या आहेत. त्यांचे जिल्हा पातळीवर आरोग्य अधिकार्‍यांकडून सत्कार झाले आहेत. या केंद्राला सध्या नव्या अधिकार्‍याची नेमणूक झाली आहे. या उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी यांनी लाईट बिल न भरल्याने 6 जून रोजी या केंद्राची वीज खंडित केली आहे. त्यामुळे गेली महिनाभर हे उपकेंद्र विजेविना काम करीत आहे. या ठिकाणी असणारे फ्रीज तसेच अन्य यंत्रणा यामुळे ठप्प झाली आहे. समुदाय आरोग्य अधिकार्‍यांना सांगूनही हे बिल न भरल्याने या केंद्रावर गेली महिनाभर नामुष्कीची परिस्थिती ओढवली आहे.

बिल आज भरले जाईल, उद्या भरले जाईल, या आशेने या सेविका शांत होत्या. परंतु, महिना विजेवीना काढल्यानंतर वैतागून शेवटी त्यांनी पाचगणी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा व तालुका आरोग्य अधिकारी महाबळेश्वर यांच्याकडे धाव घेतली आहे. संबंधित अधिकारी मात्र, याकडे दुर्लक्षच करत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करुन या उपकेंद्राचा वीज पुरवठा सुरळीत करावा. संबंधित अधिकार्‍यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Back to top button