सातारा : उरमोडी, वीर धरणातून पाणी सोडले, नद्यांच्या पातळीत वाढ, काठालगत सावधानतेचा इशारा | पुढारी

सातारा : उरमोडी, वीर धरणातून पाणी सोडले, नद्यांच्या पातळीत वाढ, काठालगत सावधानतेचा इशारा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सातारा, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, जावली या तालुक्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक धरणे विसर्गाच्या उंबरठ्यावर असून उरमोडी व वीर धरणांमधून शुक्रवारी विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसपासून पावसाने हजेरी लावली आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. जोरदार वारे, दाट धुके, अधूनमधून येणारा जोराचा पाऊस यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पश्‍चिम भागात धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. कोयना, धोम, धोम बलकवडी, उरमोडी, कण्हेर, वीर, वांग मराठवाडी, उत्‍तरमांड, तारळी, निरा देवघर,भाटघर, नागेवाडी, मोरणा, महू, हातगेघर या धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

धरणे विसर्गाच्या उंबरठ्यावर आली आहेत. वीर धरणातून उजवा कालवा विद्युतगृहातून 1 हजार 400 क्युसेक्स व डावा कालवा विद्युतगृहातून 300 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. तर धरणाच्या सांडव्यातून दुपारी 2 पासून 4 हजार 418 क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीपात्रात सुमारे 6 हजार 118 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणातील पाणी पातळी निर्धारित पाणी पातळीपेक्षा अधिक झाल्यामुळे सांडव्यावरील वक्रद्वारामधून उरमोडी नदीपात्रात सकाळी 11 वाजल्यापासून 2 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करणयात आला आहे. उरमोडी व निरा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरमांड मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. धरणाची वक्रद्वारेबंद करण्यात आली नसली तरी पुढील 48 तासात या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने तापोळा, महाबळेश्‍वर, कास, बामणोली, पाचगणी, भिलार, परळी यासह अन्य ठिकाणी भातलागणीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत.

महाबळेश्‍वर-जावलीत जोर कायम

पावसाचा बालेकिल्‍ला असलेल्या महाबळेश्‍वर व जावलीत पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सातारा 19.30 मि.मी., जावली 35.90 मि.मी., पाटण 32.10 मि.मी., कराड 9.10 मि.मी., कोरेगाव 6.10 मि.मी., खटाव 2.10 मि.मी., माण 0.50 मि.मी., फलटण 0.30 मि,.मी., खंडाळा 0.60 मि.मी., वाई 6.00 मि.मी., महाबळेश्‍वर 74.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Back to top button