सातार्‍याच्या प्रवेशव्दारावरच पाण्याचे तळे

सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा शहराचे प्रवेशव्दार असलेल्या वाढेफाटा चौकातील उड्डाणपुलाखाली पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने भर रस्त्यावरच पाण्याचे तळे साचले आहे. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. पाण्यामध्ये खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

सातारा परिसरातून महामार्ग जात असल्याने सातारा शहर व उपनगरात ये-जा करणार्‍यांसाठी महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाण पूल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका कमी होणे अपेक्षीत आहे. मात्र सध्या या उड्डाणपुलांखाली मोठमोठी पाण्याची तळी साचली आहेत. सेवा रस्त्यांवर खड्डे पडल्याने रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच समजेनासे झाले आहे. पुणे-बेंग्लोर मार्गावरील वाढे फाटा हे सातार्‍याचे प्रवेशव्दार असून या मार्गानेच महामार्गावरील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील वाहने सातारा शहरात येत असतात. मात्र हे प्रवेशव्दारच समस्येच्या गर्तेत अडकले आहे.

खड्डे, पाण्याचे तळे व वाहतूक कोंडी यामुळे वाढे फाटा चौकातून येताना वाहनधाकरांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. मागील कित्येक वर्षांपासून या चौकात गटाराची समस्या सतावत आहे. गटाराचे चेंबर तुंबल्याने वर्षभरच गटारगंगा रस्त्यावर वाहत असते. याच गटाराच्या दुरुस्तीसाठी गेल्या पावसाळ्यात खोदकाम करण्यात आले होते. आजही तिथे खड्डा खोदलेल्या स्थितीत आहे. त्यातच आता पावसाळा सुरु झाला आहे. सेवा रस्त्यावर उड्डाणपुलाखाली मोठमोठे खड्डे पडले होते. पावसाळ्याच्या तोंडावर ते भरण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात डांबर निघून खडी मोकळी होवून पुन्हा खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन सातारा शहरात येणार्‍यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच पाण्याच्या तळ्यातून रस्ता शोधताना कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, सातारा- लोणंद रस्त्यावरुन अवजड व ओव्हरलोडेड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. हा रस्ता अरुंद आहे. या मार्गावरील व्यवसायिकांकडे येणार्‍या ग्राहकांची वाहनेही रस्त्यातच उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

मोकळ्या चेंंबरला बॅरिकेटची सुरक्षा…

वाढे चौकात गटाराच्या दुरुस्तीसाठी खोदलेला खड्डा उघडाच आहे. सध्या पावसाच्या पाण्यामुळे हा खड्डा व रस्ता यांच्यातील सीमारेषा दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याने वाहतूक पोलिसांनी या मोकळ्या चेंबरजवळ बॅरिकेटस् लावून वाहतूक रोखली असली तरी सुरक्षेची ही क्लृप्ती अत्यंत तकलादू आहे. अशा परिस्थितीत केवळ बॅरिकेटसने चेंबरची सुरक्षा न करता योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा

Exit mobile version