सातारा : जिल्ह्यात 83 कोटींची एफआरपी थकीत | पुढारी

सातारा : जिल्ह्यात 83 कोटींची एफआरपी थकीत

सातारा : महेंद्र खंदारे सातारा जिल्ह्यातील गळीत हंगाम संपून आता दीड महिन्यांचा कालावधी लोटत आला तरी जिल्ह्यातील 6 साखर कारखान्यांनी बेसिक रिकव्हरीची (इथेनॉलची रिकव्हरी वगळून) एफआरपी दिलेली नाही. या कारखान्यांनी एकूण 83 कोटी 71 लाख 11 हजार रुपयांची एफआरपी थकीत ठेवली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचे दाम मिळणार तरी कधी? असा सवाल उपस्थित करत शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील 14 साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले. यामध्ये 7 सहकारी आणि 7 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. यंदा अतिरिक्‍त उसामुळे मे महिन्यापर्यंत हंगाम लांबला. त्यामुळे कारखान्यांना एफआरपी वेळेत देणे जमले नाही. परंतु, आता हंगाम संपून जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटत आला तरी 14 पैकी 6 साखर कारखान्यांनी आपली एफआरपी पूर्ण केलेली नाही. यामध्ये बहुतांश लोकप्रतिनिधींचेच कारखाने आहेत. जी एफआरपी थकीत आहे ती एकूण एफआरपीच्या खूप कमी आहे.

मात्र, आता कारखाना बंद झाल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने एफआरपी देण्याकडे डोळेझाक केली आहे. यावर शेतकरी संघटना व शेतकरीही आवाज उठवत नसल्याने उर्वरित एफआरपी कधी मिळणार? असा सवाल केला जात आहे. राज्य सरकारने यंदा दोन टप्प्यात एफआरपी देण्याची मुभा कारखानदारांना दिली. त्यानुसार हंगाम सुरु झाल्यानंतर पहिल्या महिन्यात मोठा हफ्ता कारखान्यांनी दिला. त्यानंतर काही कारखान्यांनी 100 ते 200 रुपयांपर्यंत दुसरा हफ्ता दिला. मात्र, तरीही अनेक कारखान्यांची एफआरपीची रक्‍कम पूर्ण झालेली नाही.

याबाबतची माहिती साखर आयुक्‍तांना माहीत असतानाही याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. एफआरपी थकीत असल्यास आरआरसीची कारवाई करण्यात येते. परंतु, यंदा तेही न झाल्याने शेतकर्‍यांना उर्वरित एफआरपीवर पाणी सोडावे लागणार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, ज्या कारखान्यांनी एफआरपी पूर्ण केली आहे. त्यामधील काही मोजक्या कारखान्यांनी ऊस वाहतूक तोडणीचे दर अव्वाच्या सव्वा लावले आहेत. तसेच त्यांच्या कारखान्याचा उतारा हा 10 टक्क्यांच्याच आसपास आहे. त्यामुळे मूळ एफआरपी 2900 असताना त्यात 650 ते 700 ची वाहतूक व तोडणी लावली आहे. त्यामुळे मूळ एफआरपी कमी झाली आहे. ही मूळ एफआरपी देवून त्यापेक्षा अधिक रक्‍कम दिल्याचा आव काही कारखान्यांनी आणला आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांचीच चोरी करुन त्यांच्यावरच शिरजोरी करण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे.

इथेनॉलसहितची एफआरपी कधी?

केवळ साखर उतार्‍यानुसार कारखान्यांनी एफआरपी काढली आहे. यंदाच्या हंगामात ऊस तोडणी व इथेनॉलचे धोरण राबवण्यात आले आहे. जिल्ह्यातील 9 कारखान्यांनी जवळपास 65 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे. यामुळे नक्‍की किती रिकव्हरी लॉस झाला याचे संशोधन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून झालेले नाही. त्यामुळे अंतिम एफआरपी अद्याप काढण्यात आलेली नाही. त्यामुळे इथेनॉलसहित पूर्ण एफआरपी कधी मिळणार? असा सवाल केला जात आहे.

कारखाना थकीत एफआरपी

ग्रीन पावर -10 कोटी 62 लाख 20 हजार
खटाव-माण -5 कोटी 7 लाख 14 हजार
सह्याद्री- 52 कोटी 29 लाख
किसनवीर- 4 कोटी 11 लाख 91 हजार
लो. बा. देसाई -9 कोटी 68 लाख 28 हजार
अजिंक्यतारा- 1 कोटी 92 लाख 29 हजार
एकूण- 83 कोटी 71 लाख 11 हजार
(दि. 30 जून अखेर)

हेही वाचा

Back to top button