सातारा: वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआय छापा | पुढारी

सातारा: वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआय छापा

महाबळेश्‍वर; पुढारी वृत्तसेवा: देशातील सर्वांत मोठ्या डीएचएफल घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित वाधवान बंधूंच्या महाबळेश्‍वर येथील ‘दिवाण व्हिला’ या आलिशान बंगल्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. या कारवाईत बंगल्यातील 30 ते 40 कोटी रुपयांची वॉल
पेंटिंग्ज, झुंबर, शोभेच्या वस्तू सील करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपासून सीबीआयची टीम या आलिशान बंगल्यात तळ ठोकून आहे. या कारवाईमुळे महाबळेश्‍वरमध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोना कालावधीत जिल्हाबंदी आदेशाचे उल्‍लंघन करून तत्कालीन गृहसचिव अमिताभ गुप्‍ता यांच्या पत्राचा वापर करून वाधवान बंधूंसह 23 जण लोणावळ्याहून महाबळेश्‍वरमध्ये आले होते. जिल्हाबंदी आदेशाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी 23 जणांवर महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून क्‍वारंटाईन करण्यात आले होते. महाबळेश्‍वरमध्ये दाखल झाल्यानंतर 26 एप्रिल 2020 रोजी डीएचएफल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या अधिकार्‍यांनी त्यांना अटक केली होती. तेव्हापासून वाधवान बंधू सीबीआय कोठडीत होते. या कारवाईत वाधवान यांच्या आलिशान गाड्या जप्‍त करण्यात आल्या होत्या. त्या आजही धूळ खात पडून आहेत.

महाबळेश्‍वर शहरापासून एक कि.मी. अंतरावर वाधवान बंधूंचा आलिशान बंगला आहे. शुक्रवारी सकाळी या बंगल्यात सीबीआयचे एक
पथक दाखल झाले. या पथकात 10 ते 12 अधिकारी असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे एसबीआय आणि बँक ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचारीही येथे दाखल झाले आहेत. सीबीआयचे अधिकारी आल्यानंतर महाबळेश्‍वर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारीही बंगल्यात दाखल झाले. सीबीआयने डीएचएफल घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतरच ही कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांच्या कारवाईत सीबीआयच्या पथकाने कोट्यवधींची पेंटिंग्ज, झुंबर, इतर मौल्यवान शोभेच्या वस्तू सील करण्यात येत आहेत. यामधील काही पेंटिंग्ज या उंचीवर असल्याने स्थानिक सुतार कामगारांना पाचारण करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी सीबीआयचे पथक आल्यानंतरही स्थानिकांना याचा थांगपत्ता लागला नव्हता.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर पथकातील अधिकार्‍यांनी आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यानंतर सीबीआय पथकाच्या मदतीला महाबळेश्‍वर पोलिस ठाण्याचे कर्मचारी बंगल्यावर गेले. ही कारवाई अंतिम टप्प्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. देशातील मोठमोठे दिग्गज राजकीय नेते, उद्योगपती विश्रांतीसाठी या बंगल्यामध्ये यायचे. वाधवान कुटुंबीय या बंगल्यामध्ये नववर्षाच्या स्वागताला अथवा कुटुंबियांमध्ये कुणाचाही वाढदिवस असो अथवा काही कार्यक्रम असो या बंगल्यामध्ये आले की आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट करण्यात येत होती. मात्र, सीबीआयच्या कारवाईनंतर बंगल्याच्या परिसरात सन्‍नाटा पसरला आहे.

Back to top button