सातारा : पाच नगरपालिकांचा बिगुल वाजला | पुढारी

सातारा : पाच नगरपालिकांचा बिगुल वाजला

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील ‘ब’ वर्ग असलेल्या फलटण व कराड तसेच ‘क’ वर्ग असलेल्या वाई, रहिमतपूर व म्हसवड या पाच नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 18 ऑगस्टला मतदान होणार आहे. इच्छुकांना दि. 22 ते 28 जुलैपर्यंत नामनिर्देशपत्र सादर करता येणार आहे. दि. 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर झालेल्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

नगरपालिका सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता निवडणूक आयोगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडत व मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतर अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मतदान केंद्रांची यादीही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या आदेशानुसार जे जिल्हे पावसामुळे प्रभावित होणार नाहीत त्या ठिकाणी व तुरळक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम तत्काळ राबवावा व आवश्यक असल्यास परिस्थितीनुरूप त्यात बदल करावेत, असे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याकरिता हवामान खात्यातील तांत्रिक व वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत चर्चा केल्यानंतर आयोगाने 17 जिल्ह्यांतील 77 तालुके निवडलेे आहेत. पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे 17 जिल्ह्यांतील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे क्रमप्राप्‍त असल्याने या ठिकाणी निवडणुकीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या निवडणुका सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका व संलग्‍न याचिकांमध्ये अंतिम निर्णयाच्या अधीन असतील.

राखीव जागेवर निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तथापि, जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती नामनिर्देशन पत्रासोबत सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा उमेदवारांनी निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या तारखेपासून बारा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची निवड रद्द करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात उमेदवाराकडून नामनिर्देशपत्रासोबत विहित केलेले हमीपत्र घेणे आवश्यक आहे. सार्वत्रिक निवडणुका अनिनियमातील तरतुदीनुसार घेणे आवश्यक आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी आहे.

या निवडणुकांसाठी नामनिर्देशन प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना नामनिर्देशपत्र व शपथपत्र सहजरितीने भरता यावे यासाठी महाऑनलाईनच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. सर्व संभाव्य उमेदवारांनी सॉफ्टवेअरद्वारेच नामनिर्देशपत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासाठी आयोगाने http://panchayatelection.maharashtra/gov/in ही वेबसाईट उपलब्ध करुन दिली आहे. उमेदवाराने स्वत:ची नावनोंदणी करुन नामनिर्देशपत्रामध्ये तसेच शपथपत्रामध्ये माहिती भरावी लागणार आहे. त्यावर स्वाक्षरी करुन ते निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे विहित पध्दतीने मुदतीत सादर करावे लागणार आहे. अशाप्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशपत्राचा अर्ज नामनिर्देशपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. आचारसंहिता सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेल्या नगरपालिका कार्यक्षेत्रापुरतीच मर्यादित असेल. त्यामुळे निवडणूक क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा किंवा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकार्‍यांना करता येणार नाही. प्रभाग रचना, आरक्षण व सोडत तसेच मतदार यादीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्या असल्यास त्याची खातरजमा करुन न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांची आहे. कोणत्याही रिट याचिकेमध्ये न्यायालयाने स्थगिती आदेश प्राप्‍त झाल्यास निवडणूक कार्यक्रम तत्काळ रद्द किंवा स्थगित करुन तसे आयोगाला कळवावे लागणार आहे.

निवडणूक काळात केंद्र व राज्य शासनाकडून कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपायोजना व दक्षता घेण्याबाबतच्या सुचना व निर्बंध लागू झाल्यास आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम देण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्‍ती निवडणूक क्षेत्रात उद्भवल्यास जिल्हाधिकार्‍यांनी त्याचा अहवाल तातडीने आयोगास सादर करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत. दि. 23 व 24 जुलै रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. अपिल नसेल त्याठिकाणी दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. अपिल असलेल्या ठिकाणी वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशांकडे अपिल करता येईल. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर घेण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

सातारा, म’श्‍वर, पाचगणी, मेढा निवडणूक लांबणीवर

पावसाळी तालुके तसेच विभागाबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला महसूल प्रशासनाने महिन्यापूर्वी सादर केले होते. त्यानुसार आयोगाने जादा पावसाचा प्रदेश असणार्‍या तालुक्यांतील निवडणुका जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे ‘अ’ वर्ग असलेली सातारा नगरपालिका तसेच ‘क’ वर्ग असलेली महाबळेश्‍वर व पाचगणी नगरपालिका आणि मेढा नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, या नगरपालिकांच्या संभाव्य सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडत तसेच मतदार यादी कार्यक्रम अंतिम करण्यात आला आहे. या नगरपालिकांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात, असा अंदाज आहे. सातार्‍यात तर अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. या इच्छुकांचे डोळे निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांकडून विशेषत: हद्दवाढ भागात स्वखर्चाने सार्वजनिक कामे सुरू आहेत. काहीजण गेली वर्षभर खर्च करून बेजार झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शक्‍तिप्रदर्शन करणार्‍या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत असल्याचे चित्र सातार्‍यात आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम जारी करणे              20 जुलै
अर्ज दाखल करणे                                22 ते 28 जुलै
दाखल अर्जाची छाननी                          29 जुलै
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत               4 ऑगस्ट
मतदान                                              18 ऑगस्ट
मतमोजणी                                          19 ऑगस्ट

Back to top button