सातारा : चार किलोमीटर डोंगर उतरून शाळा गाठायची | पुढारी

सातारा : चार किलोमीटर डोंगर उतरून शाळा गाठायची

चाफळ ; राजकुमार साळुंखे : चाफळपासून केळोली (ता. पाटण) येथील गावाकडे तसेच विरेवाडीकडे जाणारा चार कि. मी.संपूर्ण घाट रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या फक्त खासगी वाहने सुरू असून चार महिन्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पाऊसाने तीही बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना चार कि.मी. डोंगर उतरून व चढून केळोली येथे वाहन पकडण्यासाठी यावे लागत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी यांचे व ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत.

चाफळ, पासून केळोली विरेवाडी गावाकडे जाणारा संपूर्ण रस्ता तसेच घाट रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चाफळपासून वीस कि.मी. अंतरावर उंच डोंगरावर वसलेल्या व दोन हजारांच्या आसपास लोकवस्ती असलेल्या विरेवाडी, केळोली गावाकडे चाफळपासून जाणारा संपूर्ण रस्ता तसेच केळोली पासून चार कि.मी. अंतराचा संपूर्ण घाट रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थी यांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे तर काही शालेय विद्यार्थी यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने जवळ पैसाचा अभाव यांमुळे चार कि.मी. घाट रस्ता पायी चालून केळोली येथे वाहन पकडण्यासाठी यावे लागत आहे.तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी यांना विरेवाडीत पाचवीच्या पुढे शाळेची सोय नसल्याने उन्हाळा पाऊसाळा केळोली येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी यावे लागत आहे.

चाफळ परिसरात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे डोंगरातून आलेल्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे मोठमोठे दगड माती रस्त्यावर आली आहेत. तर काही ठिकाणी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण वाहतूक बंद झाली आहे. सध्या दोन्ही बाजूचे नाले दगड मातीने तुडुंब भरल्याने डोंगरातून येणारे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यावर कोठेही संरक्षण कठडे नसल्याने रस्ता धोकादायक बनला आहे.विरेवाडी ग्रामस्थांच्या गैरसोयीची संबंधित विभागाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.

संपूर्ण घाटरस्त्यावर खडीकरण व डांबरीकरण करून दोन्ही बाजूला योग्य नाले काढणे गरजेचे बनले आहे. निवडणुकीवेळी नेतेमंडळी गावात येऊन गावकर्‍यांना अतिवृष्टीत घराचे व पिण्याच्या पाण्याचा विहीरीचे रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थाची तातडीने नव्याने दुरुस्ती करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. ते त्यांनी पूर्ण करावे, अशी मागणी रामभाऊ झोरे, उमाजी जाधव, प्रशांत मोरे, गणपत मोरे, शंकर मोरे, गणेश चव्हाण, शहाजी सपकाळ, शांताराम काकडे, बाळाजी जाधव, विजय मोरे यांनी केली आहे.

Back to top button