हजारो हातांनी उचलला अनेक टन कचरा | पुढारी

हजारो हातांनी उचलला अनेक टन कचरा

फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा फलटण येथील पालखीतळ असलेल्या विमानतळावर दोन दिवसांच्या विसाव्यानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहे. आता प्रतिवर्षाप्रमाणे 100 एकरातील पालखीतळ स्वच्छतेची मोहीम संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटणकरांनी सुरु केली आहे. या मोहीमेद्वारे हजारो हातांनी अनेक टन कचरा उचलला आहे.

माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूकडे मार्गस्थ होताच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेमध्ये महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार,श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, गोविंदचे संचालक सत्यजितराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक अजय माळवे, असिफ मेटकरी राष्ट्रवादी काँगेसचे फलटण तालुकाध्यक्ष सतिश माने, पंचायत समितींचे सदस्य बाळासाहेब ठोंबरे, अमरसिंह खानविलकर, अनिल शिरतोडे, राहुल कुंभार, लायन्स क्लबचे अध्यक्ष विजयकुमार लोंढे – पाटील व लायन्स पदाधिकारी सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, शहरातील विविध शाळा, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये यामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शहरातील डॉक्टर्स, वकील, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कर्मचारी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पालखीतळ येथे दाखल झालेल्या सर्वांचे स्वागत करुन त्यांना मास्क आणि हॅण्ड ग्लोव्हज उपलब्ध करुन देण्यात आले. फलटण नगरपरिषद घंटा गाड्यांनी पालखी तळावर कचरा गोळा करणार्‍या सर्वांना योग्य मदत करत ज्या ठिकाणी कचरा संकलन सुरु होते तेथे जाऊन संकलित कचरा स्वीकारला.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी या कामात मोठे योगदान दिले.

Back to top button