‘कोयना’ कमी पाऊस पण अपेक्षित वीजनिर्मिती | पुढारी

‘कोयना’ कमी पाऊस पण अपेक्षित वीजनिर्मिती

पाटण ; गणेशचंद्र पिसाळ : गतवर्षात कोयना जलविद्युत निर्मितीसाठी अभूतपूर्व पाणीवापर झाला. यामुळे धरणात वर्षारंभाला कमी प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिला. जूनच्या महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नसल्याने धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी तांत्रिक मर्यादा येऊनही अपेक्षित वीजनिर्मिती सुरू आहे. सिंचनासाठी पाणी सोडावे लागत असल्याने त्याद्वारे वीजनिर्मिती होत असली तरी पश्चिमेकडील तुलनेत ती अत्यल्प आहे. जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 11.278 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाल्याची तांत्रिक आकडेवारी आहे .

कोयना धरणांतर्गत विभागात गत पावसाळ्यात परिसरातील शंभर तर धरण निर्मितीनंतरच्या साठ वर्षातील अनेक नैसर्गिक विक्रम मोडीत निघाले. याच नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीवर मात करत राज्यातील कोळसा टंचाईच्या काळात झालेली विजेची गरज भागवण्यासह अगदी तांत्रिक वर्षाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोयनेतून अखंडित वीजनिर्मिती झाली. लवादाच्या आरक्षित 67.50 टीएमटीच्या कोट्यापेक्षाही पंधरा टीएमसी अतिरिक्त पाणी वापरासाठी शासन, प्रशासनाने दाखवलेल्या सकारात्मक प्रयत्नांमुळे कोयनेतून सरासरीच्या तब्बल 652 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली.

जून महिन्यात धरणाच्या चार जलविद्युत प्रकल्पातून 192.451 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 11.278 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे. जूनमध्ये पश्चिमेकडे 4.16 टीएमसी पाण्यावर 180.874 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी 4.32 टीएमसीवर 193.469 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी पश्चिमेकडे 0.16 टीएमसी पाणीवापर कमी झाला व परिणामी 12.595 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली आहे.

पूर्वेकडे सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. जूनमध्ये सिंचनाच्या 4.03 टीएमसी पाण्यावर 11.577 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचनासाठी 0.40 व पूरकाळात सोडलेल्या 3.96 अशा 4.36 टीएमसी पाण्यावर 10.260 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 0.29 टीएमसी पाणीवापर कमी होऊनही 1.317 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली आहे. चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता यावर्षी जूनमध्ये एकूण 8.19 टीएमसी पाण्यावर 192.451 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्याचवेळी गतवर्षी 8.68 टीएमसी पाण्यावर 203.729 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पांसाठी 0.49 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने 11.278 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

Back to top button