सातारा : हलक्या सरींच्या भरवशावर पेरणी करायची का? | पुढारी

सातारा : हलक्या सरींच्या भरवशावर पेरणी करायची का?

सायगाव ः सुहास भोसले गेल्या अनेक दिवसांपासून मृग नक्षत्रातील पावसाने पाठ फिरवल्याने सायगाव विभागातील पेरण्या रखडल्या असून, वेळेत पाऊस न पडल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कधीतरी येणार्‍या पावसाच्या हलक्या सरींच्या भरवशावर पेरणी करावी की नाही? अशा द्विधा मन:स्थितीत या विभागातील शेतकरी सापडला आहे. सायगाव विभागातून धोम धरणाचा कालवा गेला असला तरी या विभागातील शेतकरी पावसावरच अवलंबून आहे.

कालव्यामुळे सायगाव, खर्शी, रायगाव, आनेवाडी, प्रभुचीवाडी, महामुलकरवाडी, पवारवाडी या गावातील क्षेत्र बागायती आहे. या गावांसह मोरघर, पवारवाडी, महिगाव, दुदुस्करवाडी, कदमवाडी, दरे, जावळेवाडी, येरुणकरवाडी अशा सर्वच गावांना सध्या मुबलक पावसाची गरज आहे. सध्या सायगाव विभागातील शेतकरी पेरणी करण्याच्या तयारीत आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत तर काही ठिकाणी रखडल्या आहेत. पावसाची आवश्यकता असताना कधीतरी पावसाची सर येत आहे. दमदार पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे सध्या शेतकरी द्विधा मन:स्थितीत आहे.थोड्या दिवसांत दमदार पाऊस पडला नाही तर हंगाम तर वाया जाणार आहेच, परंतु जगायचे कसे? हा यक्ष प्रश्‍न बळीराजासमोर उभा राहिला आहे.

समाधानकारक पाऊस न झाल्यास सण, उत्सवावर परिणाम

खरीप हंगाम वाया गेल्यास सायगाव विभागातील शेतकरी अडचणीत येणार आहे. बागायती क्षेत्र धोक्यात येवून उत्पन्नात मोठी घट होणार आहे. शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागत व पेरणीसाठी बँका, सोसायट्यांचे आर्थिक कर्ज घेतले आहे. पावसाअभावी सर्वच व्यवसाय, शेती अडचणीत येणार आहे. सध्या शेतकर्‍यांवर दुहेरी संकट असून संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित कोलमडून जाणार आहे. चांगला पाऊस न पडल्यास होवू घातलेल्या सण, उत्सवावर त्याचा विपरीत परिणाम होवू शकतो. पुरेसा पाऊस न पडल्याने रोगराईला डोके वर काढण्यास वाव मिळणार आहे.

Back to top button