सातारा : स्वस्त धान्य बेकायदेशीर विक्री केल्यास कारवाई

उंडाळे : वैभव पाटील केंद्र व राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात मिळणारे धान्य रेशन कार्ड धारकाने खासगी व्यापार्याला विक्री केल्यास व ते धान्य त्या व्यापार्याने खरेदी केल्यास दोघांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कराडचे तहसीलदार विजय पवार यांनी याबाबत एक परिपत्रक जारी केले असून, त्यामध्ये त्यांनी याबाबत इशारा दिला आहे. 29 जुलै 2022 रोजी जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी दूरध्वनी संदेशाद्वारे संबंधित तहसीलदारांना याबाबतची सूचना केली आहे.
कराड तालुक्यातील पात्र रेशन कार्डधारकांना केंद्र सरकारकडून पाच किलो प्रति व्यक्ती मोफत धान्य पुरवठा केला जातो. तर पाच किलो अल्पदराने असे दहा किलो धान्य दिले जाते. परंतु हेच सवलतीच्या दरातील धान्य रेशन कार्ड वर खरेदी केल्यानंतर रेशन कार्डधारक स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करून मोक्याच्या ठिकाणी बसणार्या व्यापार्यांना अथवा दुकानदारांना विक्री करतात. याबाबतच्या तक्रारी तहसील कार्यालयाकडे आल्यानंतर शासनाने हे धान्य खरेदी विक्री करणार्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेतला.
शासनाकडून अनुदानित दराने मिळणारे धान्य जादा दराने विक्री करणे व खरेदी करणे हा गुन्हा आहे अशा प्रकारचे धान्य विक्री करत असेल तर संबंधित रेशन कार्डधारकाला व खरेदी करणार्या व्यापार्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही संबंधिताना करण्यात आल्या आहेत. रेशनवरील धान्य खरेदी करणार्या संबंधित व्यापार्यावर ही फौजदारी गुन्हा दाखल करून तो धान्यसाठा जप्त करण्यात येणार आहे. तर रेशन कार्डधारकावरही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांने मागील तीन वर्षात जेवढे धान्य रेशनवर घेतले त्याची चालू बाजारभावाप्रमाणे वसुली करणे व रेशनवर मिळणार्या धान्याचा लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. असा इशाराही देण्यात आला आहे. कराडचे तहसीलदार विजय पवार यांनी एक जुलै रोजी याबाबत परिपत्रक काढून याबाबतचा इशारा दिला आहे. या इशार्याने रेशनवरील धान्य खरेदी -विक्री करणार्या अनेक ग्राहक व व्यापार्यांच्या खरेदी- विक्रीला आळा बसणार आहे.
खर्या अर्थाने लाभार्थ्यांना मिळणार लाभ
स्वस्त धान्य दुकानामध्ये रेशन आल्यानंतर त्याचा लाभ अनेकदा खर्या लाभार्थ्यांना मिळतच नाही. रेशन दुकानदार हे धान्य व्यापार्यांना विकून त्याचा डबल फायदा मिळवत असल्याचे निदर्शनास येते. रेशनधारक रेशन नेण्यास गेल्यावर त्याला दुकानदार धान्य संपले आहे, पुन्हा मिळेल, धान्याचा कोटा कमी आला असे सांगून बोळवण करत असतो. त्यामुळे रेशनधारक लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित राहतो. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांबाबतही असे निर्णय व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तहसीलदारांच्या निर्णयाचे स्वागत
ज्या ग्राहकाला स्वस्त धान्याची गरज नाही असे ग्राहक धान्य घेवून ते धान्य बाजारात विकतात. मात्र, ज्या ग्राहकाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे किंवा रेशनवर मिळणार्या स्वस्त दरातील धान्यावर त्याची गुजराण होत असते असा लाभार्थी उपाशी राहतो. त्यामुळे तहसीलदारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यात 50 हजार लाभार्थी
कराड तालुक्यात 280 ते285 स्वस्त धान्य दुकानदारांच्या मार्फत सुमारे 40 ते 50 हजार रेशन कार्डधारकांना मोठ्या स्वरूपात स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. प्रति कार्डधारकास 20 ते 25 किलो धान्य दरमहा अनुदानावर व मोफत दिले जाते.