फलटणवासियांकडून माऊलींना भक्‍तीमय निरोप | पुढारी

फलटणवासियांकडून माऊलींना भक्‍तीमय निरोप

फलटण : पुढारी वृत्तसेवा कैवल्य सम्राट संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखी सोहळ्याने टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात पुन्हा नवा उत्साह घेवून रविवारी सकाळी माऊलींचा पालखी सोहळ्याने फलटण येथून बरडकडे प्रस्थान केले. फलटणवासियांनी माऊलींना भक्‍तीमय वातावरणात निरोप दिला. उठी पुत्रागाई बाला, तीर्थे रे हिंड । साधु आणि संत जेथे असती बा उदंड होय होय वारकरी, पाहेरे पंढरी । संत भार पंढरीत, किर्तनाचा गजर होत॥ या संत अभंगवाणी प्रमाणे सारे घरदार सोडून संसाराची कोणतीही आठवण होवू न देता पालखी सोहळ्याच्या तीर्थयात्रेत तल्लीन झालेला श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी सोहळा हरिनामाचा गजर करत एक दिवसाच्या मुक्कामाकरीता ऐतिहासिक फलटण तालुक्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरडनगरीत विसावला आहे.

पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेला वैष्णवांचा मेळा अगदी आनंदी दिसत होता. त्याचे कारण म्हणजे आपल्या पांडुरंगाच्या भेटीतील जवळजवळ अर्धेहुन अधिक अंतर कापले होते. तर दुसरीकडे पुणे, सातारा जिल्ह्यातील आपला मुक्काम संपवून विठुरायाच्या सोलापूर जिल्ह्यात सोमवारी प्रवेश करणार आहे. बरड मार्गावर पालखी सोहळा आल्यानंतर सोहळ्यातील विश्‍वस्त व मानकर्‍यांचा सत्कार या मार्गावरील सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला. तर दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

शहराच्या सरहद्दीवर फलटण शहर व तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रिडा, कृषी, सहकार, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व विठ्ठलभक्तांनी पालखी सोहळ्याचे ऐतिहासिक बरड नगरीत शाही स्वागत केले. पालखी सोहळा बरडनगरीत आल्यानंतर वारकर्‍यांमधला पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी मनाचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो आणि पुन्हा नवीन उत्साह घेवून वारकरी आपल्या दैवताला भेटण्यासाठी जात असताना बरडवासियांचा निरोप घेवून सोमवारी सकाळी सातारा जिल्ह्यातील अखेरचा मुक्काम उरकून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

Back to top button