सातारा : निधी पडून पण विद्यार्थ्यांना मिळेना गणवेश | पुढारी

सातारा : निधी पडून पण विद्यार्थ्यांना मिळेना गणवेश

सातारा; प्रविण शिंगटे : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीमधील पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटपाचे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाने केले होते. मात्र शाळा सुरु होवून 15 हून अधिक दिवसाचा कालावधी लोटला असला तरी बहुतांश विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समितीकडे पाठवलेला 4 कोटी 99 लाख 44 हजार रुपयांचा निधी धुळखात पडून राहिला आहे. याला जबाबदार असणार्‍या शिक्षकांसह समिती सदस्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होवू लागली आहे.

जिल्ह्यातील पहिली ते आठवीमधील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्—यरेषेखालील मुलांना मोफत गणवेश वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार समग्र शिक्षा अभियानांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशासाठी 600 रुपयांचा निधी शासनाकडून मिळतो. सन 2022-23 या नवीन शैक्षणिक वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा यासाठी शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 83 हजार 241 विद्यार्थ्यांसाठी 4 कोटी 99 लाख 44 हजार 600 रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. या निधीचे वितरण मे महिन्यात तालुकास्तरावरुन शाळास्तरावर करण्यात आले होते. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, अशी आशा विद्यार्थ्यांच्या पालकांना होती. मात्र शाळा सुरु होवून 15 हून अधिक दिवसाचा कालावधी उलटला तरीही अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत येत आहेत. त्यामुळे शाळांना मिळालेल्या गणवेशाच्या निधीचे नेमके शाळा व्यवस्थापन समितीने काय केले? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे.

शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार…

गणवेश पुरवठ्याबाबतचे सर्व अधिकार शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहेत. शाळा समिती गणवेश खरेदी करुन वितरीत करणार आहे. पूर्वी गणवेश खरेदीवरुन शिक्षक व सदस्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडत होते. त्यामुळे पालक व लाभार्थी पालकाच्या बँक खात्यावर गणवेशाचा निधी वर्ग करण्यात येत होता. मात्र पालकही हे गणवेशाचे पैसे खर्च करत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे यावर्षी समितीच्या खात्यावर गणवेशाचा निधी वर्ग करण्यात आला असला तरी हे गणवेश कधी मिळणार याबाबत पालकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळा समितीच्या गठणाबाबत उदासिनता

जिल्ह्यात शाळा सुरु होवून 15 दिवसाचा कालावधी लोटला तरी शाळा व्यवस्थापन समिती गठणाबाबत उदासिनता दिसून येत आहे. नवीन समित्यांची शाळा स्तरावर निवड प्रक्रिया रखडली आहे. गणवेश वाटपाला उशीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी मुदत संपलेल्या शाळा व्यवस्थापन समित्या त्वरित गठीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Back to top button