मंत्रीपदासाठी सातारा जिल्ह्यात चुरस | पुढारी

मंत्रीपदासाठी सातारा जिल्ह्यात चुरस

सातारा : पुढारी वृत्तसेवा
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता सातारा जिल्ह्यात आणखी कुणाकुणाला मंत्रीपद मिळणार?याविषयी प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी असलेल्या शंभूराज देसाई यांचे मंत्रीपद निश्‍चित असून त्यामुळेच शंभूराज ‘ओक्केमध्ये’ असल्याचे बोलले जात आहे. भाजपमधून आ.शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे यांचीही नावे चर्चेत आहेत तर शिंदे यांच्या बंडात सहभागी असलेल्या आ. महेश शिंदे यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्यालाच मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याला आणखी किती मंत्रीपदे मिळणार? याची आता चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तब्बल पाच खात्यांची राज्यमंत्रीपदे असणार्‍या शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडात सामील झाल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंंद्र फडणवीस यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध शंभूराज देसाई यांना उपयोगी पडणार आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू असलेले शंभूराज देसाई त्यामुळेच कॅबिनेट मंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत.

भाजपमध्ये मात्र मंत्रीपदासाठी जोरदार चुरस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये तीन वर्षापूर्वी प्रवेश केलेल्या आ. शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रीपदाची तीव्र इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अभयसिंहराजे भोसले यांच्यावरही अन्याय केला होता तर शरद पवार व अजित पवार यांच्याशी प्रामाणिक राहूनही आ. शिवेंद्रराजे भोसले यांना राष्ट्रवादीने मंत्रीपदापासून वंचित ठेवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र प्रवेशावेळी शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रीपदाचा शब्द दिला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील शिवेंद्रराजेंना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद देवून मराठा समाजाला फडणवीसांकडून भेट दिली जाईल, असे बोलले जात आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आ. जयकुमार गोरे यांचेही नाव मंत्रीपदाच्या चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्‍तेशी कायम पंगा घेवून आ. जयकुमार गोरे यांनी माण-खटाव तालुक्यात भाजपचे कमळ फुलवले आहे. राज्यातला ओबीसी चेहरा म्हणून आ. जयकुमार गोरे यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभेच्या निवडणुकीवेळी आ. जयकुमार गोेरे यांना मंत्रीपद देवू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे आ. गोरे यांचेही नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर अशी लॉबी आ. जयकुमार गोरे यांच्या मंत्रीपदासाठी प्रयत्नशील आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आ. जयकुमार गोरे यांचे मित्रत्वाचे संबंध असल्याने फडणवीस गोरेंना मंत्रीपद देतील असे बोलले जात आहे. मात्र, भाजप एकावेळी दोघांना मंत्री करणार का? याविषयी उत्सुकता आहे.
कोरेगावात राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते आ. शशिकांत शिंदे यांना पराभूत करून निवडून आलेले आ. महेश शिंदे यांचेही नाव मंत्रीपदाच्या यादीत आहे. महेश शिंदे हे तसे भाजपच्या विचारसरणीचे. शिवसेना-भाजपच्या तिकिट वाटपात आ. महेश शिंदे यांच्या वाट्याला शिवसेनेचे तिकिट आल्याने ते शिवसेनेचे आमदार झाले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड करताच ते त्यात सामील झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा म्होरक्या म्हणून आ. महेश शिंदे यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे भाजप धक्‍कातंत्र वापरून ऐनवेळी आ. महेश शिंदे यांनाही मंत्रीपदाचे गिफ्ट देवू शकते. त्यामुळे सातारा जिल्ह्यात चारही हेवीवेट नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. मंत्रीमंंडळ विस्तारात नेमकी कुणाला संधी मिळणार याची त्यामुळे उत्सुकता आहे.

उदयनराजे फडणवीसांना भेटल्याने कुतुहल

राज्यात सत्तांतर होताच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सागर बंगल्यावर जावून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांचे अभिनंदनही केले. सातारा जिल्ह्यातील मंत्रीपदाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना उदयनराजेंनी फडणवीसांची भेट घेतल्याने एकच कुतूहल निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे उदयनराजेंची फडणवीसांशी चर्चा सुरू असताना दुसर्‍या खोलीत आ. शिवेंद्रराजे भोसलेही बसले होते. फडणवीसांना भेटल्यानंतर बाहेर येताच खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांनी उदयनराजेंची भेट घेतली. तिघांमध्ये कानगोष्टीही झाल्या. फोटोसेशनही झाले. त्यामुळे उदयनराजेंचा कल कुणाच्या बाजूने? याची तिथेच चर्चा सुरू झाली.

आ. शिवेंद्रराजे, आ. जयकुमार गोरे एकत्र भेटले

देवेंंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, खा. रणजितसिंह ना. निंबाळकर हे एकत्र फडणवीसांना भेटले. सत्तांतराबद्दल त्यांनी फडणवीसांचे अभिनंदन केले. मात्र, त्याचवेळी दोघांच्याही समर्थकांनी स्वतंत्रपणे फडणवीसांची भेट घेतल्याचे समजते.

Back to top button