कराडात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकला ठार | पुढारी

कराडात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकला ठार

कराड ः पुढारी वृत्तसेवा :  मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकला ठार झाला. कराडातील वाखाण परिसरातील जगताप वस्तीवर सोमवार दि. 27 रोजी दुपारी 3 च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. घराच्या अंगणातून खेळत असलेल्या चिमुकल्याला कुत्र्यांनी ऊसाच्या शेतात फरफटत नेले होते.

राजवीर राहुल ओव्हाळ (रा. जगताप वस्ती, वाखाण, कराड) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. कराडातील वाखाण परिसरात असलेल्या जगताप वस्तीवर राहुल ओव्हाळ हे पत्नी वैशाली, तीन मुली व मुलगा राजवीर यांच्यासह वास्तव्यास आहेत. राजवीरचे वडील राहुल हे ट्रॅक्टर चालक असून सोमवारी दुपारी ते ट्रॅक्टर घेऊन कामासाठी गेले होते. तर वैशाली या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात भांगलण करीत होत्या.

तर राजवीर हा बहिणींसह घराच्या अंगणात खेळत होता. काही वेळानंतर राजवीर कुठेच दिसत नसल्याचे बहिणींच्या लक्षात आले. सर्वांनी शोध घेतला असता नजीकच असलेल्या ऊसाच्या शेतात कुत्र्यांच्या झुंडीमध्ये राजवीर निपचीत पडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. राहुल यांच्यासह शेतकर्‍यांनी कुत्र्यांना हुसकावून लावत त्याठिकाणी धाव घेतली. राजवीरच्या गळ्यासह पाय आणि हाताचे कुत्र्यांनी लचके तोडले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button