पाटण : कोेयना धरणात कमी पाणीसाठा चिंतेचा विषय | पुढारी

पाटण : कोेयना धरणात कमी पाणीसाठा चिंतेचा विषय

पाटण; गणेशचंद्र पिसाळ : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होऊनही कोयना धरणात अपेक्षित पाऊस व पाणीसाठा झाला नसल्याने, आगामी काळातील सिंचन व वीजनिर्मितीबाबत कमालीची चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी याहीपेक्षा कितीतरी पटीने कमी पाणीसाठा होऊनही जुलै, ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसात हे धरण पूर्ण क्षमतेने भरून पुन्हा पूर्वेकडे विनावापर पाणी सोडल्याने महापुराची परिस्थिती निर्माण झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे याहीवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा अभ्यासकांचा दावा आहे.

लांबणीवर गेलेल्या पावसामुळे ऐनवेळी जुलै, ऑगस्टमध्ये कमी काळात जादा पाऊस होवून सार्वत्रिक विध्वंस होऊ नये या भीतीतही स्थानिक मंडळी असून, प्रशासनासह स्थानिकांनीही याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. एक जूनपासून कोयना धरणाच्या नव्या तांत्रिक वर्षाची सुरुवात झाली. या तेवीस दिवसांत धरणांतर्गत विभागातील कोयना 106 मिलिमीटर, नवजा 141 मिलिमीटर व महाबळेश्वर 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात अवघा 14.45 टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्त साठा अवघा 9.45 टीएमसी इतकाच शिल्लक आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही पूर्वेकडे सिंचनासाठी अखंडित प्रतिसेकंद 2100 क्युसेक्स पाणी सोडावेच लागत आहे. अपुर्‍या पाण्यामुळे पश्चिमेकडील वीजनिर्मितीवर कमालीच्या मर्यादा आल्या आहेत. पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणार्‍या पाण्यावरील अत्यल्प वीजनिर्मितीमुळे संबंधित वीज व त्यावर होणारे आर्थिक नुकसानही तितकेच महत्त्वाचे आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अद्यापही कमी पाऊस झाला आहे. गतवर्षी जुलैच्या अखेरच्या काही दिवसांत पावसाने धरण निर्मितीनंतरचे अनेक विक्रम मोडीत काढले. कमी काळात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला या अतिवृष्टी, महापूर व भूस्खलनामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व अब्जावधींची वित्तहानी झाली. वैयक्तिक व सार्वजनिक अशी अभूतपूर्व हानी गतवर्षी झाली. तो दुर्दैवी अनुभव पुन्हा वाट्याला येऊ नये या भीतीतच सद्या स्थानिकांचे वास्तव आहे. शासन प्रशासनाकडून भलेही आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक खबरदारी, उपाययोजना, जनजागृती, आवाहने केली जात असली प्रत्यक्षात बेभरवशी नैसर्गिक परिस्थितीवरच अवलंबून आहे.

सध्या अपेक्षित व टप्प्याटप्प्याने पडणारा पाऊस व्हावा हा कोणत्याही प्रकारची हानी न करता सार्वत्रिक दिलासादायक ठरवा. अपेक्षित वेळेत धरण पूर्ण क्षमतेने भरून आगामी सिंचन व वीजनिर्मितीचा सुखकर प्रवास घडावा, अशा अपेक्षा व्यक्त होत आहे.

Back to top button