वाई : महागणपती पुलावर अपघातास निमंत्रण | पुढारी

वाई : महागणपती पुलावर अपघातास निमंत्रण

वाई; पुढारी वृत्तसेवा : वाईच्या महागणपती पुलावरील वाहतुकी संदर्भात पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. तर पालिकेने पुलावरील किरकोळ व्यावसायिकांना दुकाने थाटण्याचीच परवानगी देवून त्यांच्या जीवाशी खेळत आहे. याचबरोबर महागणपतीच्या दर्शनासाठी येणारे भाविक पुलावरच वाहने पार्क करत असल्याने या पुलावरून वाहनधारकांना कसरत करावी लागते. तर पायी चालणार्‍यांनाही अडचणी येतात. यामुळे वाईकर हैराण झाले असून महागणपती पुलावर थाटलेली दुकाने, पार्क वाहने अपघातास निमंत्रण देत आहेत.

महागणपती पूल व चित्रा टॉकीज समोरचा रस्ता हा अतिशय किचकट व रहदारीचा आहे. त्यामुळे हा रस्ता सातत्याने मोकळा कसा राहिल याची काळजी पालिकेने घेणे गरजेचे आहे. मात्र, त्यावर कार्यवाही होत नाही. त्यामुळेच महागणपती पुलाचा श्वास कोंडला आहे. भाजी मंडईमध्ये व्यवसायासाठी स्वतंत्र व्यवस्था असताना महागणपती पुलावर पालिका बाहेरून येणार्‍या व्यापार्‍यांना कोणत्या आधारावर दुकाने लावण्यास परवानगी देते हा संशोधनाचा विषय आहे.

सध्या नवीन पुलाचे बांधकाम चालू असल्याने या पुलावर नेहमीच जीवघेणी गर्दी असते. वाईच्या बाहेर जाणारी रहदारी याच पुलावरून होत असल्याने तसेच महागणपतीला येणारे पर्यटक, वडाप वाहतूक याच पुलावरून होते. त्यामुळे वाहनधारकांना मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागते. तर पायी चालणार्‍यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.

महागणपती पुलावरील अवैध व्यवसाय करणारे व्यापारी कुणाचीही भीती न बाळगता पुलावर बिनधास्त ठिय्या मांडून बसलेले असतात. यावर पोलिसांचा कोणताही वचक नाही. तर पालिका सातत्याने दुर्लक्ष करते. या व्यवसायिकांचे जरी हातावर पोट असले तरी त्यांचा जीव यापेक्षा महत्वाचा आहे. परंतु, त्याची कोणालाही फिकीर नसल्याचेच चित्र सध्या दिसत आहे.

यामुळे या पुलावर मोठा अपघात होण्याची वाट पालिका व पोलिस पाहत आहेे का? असा सवाल केला जात आहे. वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. पोलिस व पालिका प्रशासन यांनी एकत्रितपणे वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी त्वरित करावी. पुलावरील अतिक्रमण हटवावे, अशा मागण्या जोर धरू लागल्या आहेत.

Back to top button