सातारा : कसलीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही ठाकरेंसोबत : नरेंद्र पाटील | पुढारी

सातारा : कसलीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही ठाकरेंसोबत : नरेंद्र पाटील

सातारा; पुढारी वृत्तसेवा : नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचे निशान फडकवल्यानंतर त्यांचेच मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सेनेचे जिल्ह्यातील मंत्री ना. शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे यांच्यासमवेत राहणार की नाही? या प्रश्नाला मात्र बहुतांश पदाधिकार्‍यांनी बगल देत चुप्पी साधली. आमच्यासाठी ‘मातोश्री’चा शब्द अंतिम असतो, शिवसेना एकसंध राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ना. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत खळबळ उडाल्यानंतर त्यांचेच मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील सेना पदाधिकार्‍यांमध्येही कमालीची अवस्थता आहे. पाटणचे ना. शंभूराज देसाई व कोरेगावचे आ. महेश शिंदे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असल्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची काय भूमिका राहणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर सेना पदाधिकार्‍यांनी ‘पुढारी’शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, जिल्हयातील शिवसैनिक स्व. बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. सध्याच्या घडामोडीनंतर जिल्हयातून शिवसेनेच्या समर्थनार्थ आंदोलने करण्यात आली आहेत. सध्या सुरू असलेल्या पक्षातील घडामोडीवर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मातोश्रीवरून जो आदेश येईल तो आमच्यासाठी अंतिम असेल. परंतु दोन दिवसात सर्वकाही व्यवस्थित होईल.

माजी आ. सदाशिव सपकाळ म्हणाले, मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी आपले मत उघड मांडले आहे तर ना. एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी का आहे ते व्यक्त केले आहे. या सर्व घडामोडीतून लवकरच मार्ग निघेल. शिवसेना हि एकसंघ रहावी हीच प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा आहे.

शिवसेनेचे माण-खटावचे शेखर गोरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी माण-खटाव व कणकवली याठिकाणी शिवसेना व भाजपची युती तुटली होती. त्यावेळी ना. उद्धव ठाकरे यांनी माझ्यासाठी सभा लावली होती. आम्ही पक्षप्रमुख मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. महाविकास आघाडीत कामे झाली नाहीत हे बरोबर आहे. मात्र, ज्या जनतेने ज्यांना आमदार केले त्यांनी जनतेचा किंवा कार्यकर्त्यांचा विचार घेणे गरजेचे होते.

जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव म्हणाले, मातोश्रीवरून येणारा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहे. पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहे. ना. शंभूराज देसाई व आ. महेश शिंदे यांच्याशी आमचा संबंध नाही.

माजी जिल्हाप्रमुख हणमंत चवरे म्हणाले, आम्ही कट्टर शिवसैनिक असून आम्ही पक्षप्रमुख मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. सध्या भाजप बरोबर जरी शिवसेना सत्तेत गेली तरी ते त्रासदायक आहे. भाजपने शिवसेनेला सन्मानाची वागणूक दिली तर सत्ता स्थापन करावी. महाविकास आघाडीत राहून शिवसेनेचा काहीच फायदा नसून फक्त खच्चीकरण होत आहे. उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते म्हणाले, जिल्ह्यातील शिवसैनिक हे शिवसेनेबरोबर आहेत. उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेना व शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे आहेत.
ज्या काही शिवसेना आमदारांबरोबर इतर अपक्षांनी जे बंड केले आहे त्यांनी कोणताही स्वतंत्र पक्ष स्थापन केला नाही. शिवसेना आमदारांनी पक्षही सोडला नाही त्यामुळे येत्या दोन दिवसात याबाबतचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ जिल्ह्यात बॅनर

ना. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जिल्हा हद्दीतील महामार्गावर ठिकठिकाणी जोरदार बॅनरबाजीही करण्यात आली आहे. मोठमोठे फ्लेक्स ठिकठिकाणी लावण्यात आले असून त्यावर ‘लोकांचा लोकनाथ एकनाथ…’ असा उल्लेखही करण्यात आला आहे. सातार्‍यासह जावली व महाबळेश्वर तालुक्यातील अनेक शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत.

Back to top button