वाई तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत | पुढारी

वाई तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत

भुईंज : पुढारी वृत्तसेवा वाई व भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. बेकायदा मटका, जुगार, दारू, गुटखा, सावकारी व गौण खनिज तस्करी हे धंदे राजरोसपणे सुरू आहेत. या अवैध धंद्यावर वचक बसवण्यासाठी पोलिसांना अपयश आले आहे. यामुळे पोलिसांचे याकडे लक्ष नसल्यचे स्पष्ट होत आहे. तालुक्यात वाई व भुईंज ही दोनच पोलिस ठाणी आहेत. मात्र, फोफावलेला मटका व जुगार अड्ड्यावर पोलिसांचा अंकुश नसल्याचे दिसून येते. शहरासह तालुक्यात मोठया प्रमाणात अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

वाईच्या सोमवारच्या आठवडा बाजारात भुरट्या चोरांची संख्या वाढली असून किरकोळ चोरीचे प्रमाण वाढले आहे. तर भुईंज पोलिस स्टेशन हद्दीतील शेती अवजारे, विद्युत केबल, विद्युत मोटारींच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. दारू, आंबा, मटका असे अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत याची चर्चा सुरू आहे. गल्‍ली-बोळात सुरू असलेले जुगाराचे अड्डे, हॉटेल व ढाब्यावर मिळणारी दारू यामुळे तरूण पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. त्यातच बेकायदा सावकारीचे तालुक्याला ग्रहणच लागले आहे. हे सावकार मासिक 10 ते 15 टक्के आकारणी करून नागरिकांची लूट करत आहेत. यामुळे अनेकांनचे संसार उध्दवस्त होवू लागले आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंदे तेजीत असल्याचे चित्र आहे.

पैसे मिळविण्याच्या हव्यासात पूर्ण नुकसान
मटक्यात ओपन व क्‍लोज याप्रमाणे आकडे लावले जातात. ओपनमध्ये आकडा लागला तर लालसेपोटी आलेले पैसे परत क्‍लोज आकड्यात लावले जातात. परंतु, क्‍लोजमध्ये आकडा न लागल्याने मिळालेल्या रकमेलाही मुकावे लागते. तसेच व्यसनाधीनता वाढते. कमी अवधीत जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासात पूर्ण नुकसान होत आहे. त्यामुळे मटका बंद करावा, अशी मागणी नागरिक करत आहे.

Back to top button