सातारा : महाराष्ट्रात लवकरच भाजपचे सरकार : आ. शिवेंद्रराजे | पुढारी

सातारा : महाराष्ट्रात लवकरच भाजपचे सरकार : आ. शिवेंद्रराजे

सातारा : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात लवकरच भाजप नेते आ. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल. त्याच्या हालचाली सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या विजयानंतर सुरू झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. विधान परिषद निवडणुकींच्या विजयानंतर भाजपाच्यावतीने मोती चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर ना. एकनाथ शिंदे हे भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. शिवेंद्रराजे म्हणाले, विरोधी पक्षनेते आ. देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ. चंदक्रात पाटील यांच्या माध्यमातूनच जे काय असेल त्या चर्चा वगैरे चालू असतात. जे काय निर्णय होतील ते त्यांच्या माध्यमातूनच होतील. ते निर्णय आमदारांना योग्य वेळी कळवले जातील. त्यांच्याकडूनच याबाबतची माहिती मिळेल, असेही आ. शिवेंद्रराजे म्हणाले.

ठाकरे सरकार अल्पमतात येईल का? असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सरकारबद्दल नाराजी आहे.तीन पक्षाचे सरकार असूनसुध्दा त्यांच्यामध्ये एकमत दिसत नाही तसेच वेगवेगळे प्रवाह दिसतात. विधान परिषद निवडणुक निकालावरून हे सिध्द झाले आहे. त्यामुळे पुढे काय होतेय तसेच हे सरकार टिकेल न टिकेल या गोष्टी आपल्याला लवकरच कळणार आहेत. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे दोन्ही निवडणुकांमधील नियोजन बघितलेले आहे. आम्हाला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस शांत बसतील, असे वाटत नाही. योग्य पध्दतीने त्यांचे नियोजन सुरू असते. भाजपाचे सरकार येणार असा अनेक वेळेला दावा करण्यात आला ही सुरूवात आहे का? असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, नक्कीच महाराष्ट्रात परिवर्तनाची सुरूवात झाली आहे. लवकरच राज्यात आपल्याला परिवर्तन झालेले आपल्याला पहायला मिळेल.

सातार्‍यात भाजपाचा विजयोत्सव

विधान परिषद निवडणूकीत भाजपाने पाच जागांवर विजय संपादन केल्याने सातारा शहरातील मोती चौकात भाजपच्यावतीने आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह भाजपा पदाधिकार्‍यांनी नागरिकांना साखर व पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, कोण म्हणतंय येत नाय आल्याशिवाय रहात नाही अशा विविध घोषणांनी मोती चौक परिसर दणाणून गेला होता. या विजयोत्सव सोहळ्यास आ. शिवेंद्रराजे भोसले, राजूभैय्या भोसले, अविनाश कदम, विकास गोसावी, नगरसेवक बाळासाहेब जांभळे, प्राची शहाणे, विजय काटवटे, प्रविण शहाणे, सौ.सुनिशा शहा, फिरोज पठाण, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, प्रशांत जोशी, चंदन घोडके, रवी आपटे, विकास बनकर, कुंजबाला खंदारे, नजमा बागवान, मनीष महाडवाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button