सातारा : कारखान्यांकडून साखरेवरील कर्ज उचलीत घट | पुढारी

सातारा : कारखान्यांकडून साखरेवरील कर्ज उचलीत घट

सातारा : महेंद्र खंदारे

यंदाच्या गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील 9 कारखान्यांनी तब्बल 11 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. इथेनॉलचे थेट कंपन्यांशी करार असल्याने याचे पैसे आठवड्यातच मिळत असल्याने कारखान्यांना शेतकर्‍यांची एफआरपी देणे सोपे झाले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांकडून कर्ज उचलीत घट झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात सर्व कारखान्यांनी मिळून 700 ते 1 हजार कोटी रुपयांचे कर्ज कमी घेतल्याने त्याचा फटका बँकांना बसला.

यंदाच्या हंगामात सातारा जिल्ह्यातील 14 कारखान्यांनी सहभाग घेतला होता. हंगाम सुरू करण्यापूर्वी कारखान्यांना तयारी करण्यासाठी विविध बँकांकडून कर्ज घेतले जाते. यापूर्वीच्या असलेल्या साखर साठ्यावर बँकांकडून सुमारे 85 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यानंतर कारखाने एफआरपी व अन्य देणी देत असतात. जस जशी साखर विक्री होईल तसे कर्ज कारखाने फेडत असतात. साखर व इतर उत्पादनांची विक्री झाल्यानंतर लवकर पैसे मिळत नसल्याने कर्ज घेणे भाग आहे.

परंतु, केंद्राने इथेनॉल उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिल्यानंतर थोडेसे चित्र बदलले आहे. इथेनॉल उत्पादन करण्यापूर्वीच त्याचे करार पेट्रोलियम कंपन्यांशी केले जात आहे. याचे पैसे आठवडयातच मिळत असल्याने कारखान्यांना एफआरपी देणे सोपे झाले आहे. त्यामुळे कारखान्यांकडून कर्ज उचलीत घट झाली आहे.

जिल्ह्यात काही कारखान्यांनी मागील हंगामात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 1 हजार 700 कोटींचे कर्ज उचलले होते. मात्र, यंदाच्या हंगामात या कर्जात 700 कोटींची घट झाली. याचबरोबर अन्य बँकांकडून घेतल्या गेलेल्या कर्जाचा आकडाही सुमारे 300 कोटींनी घटल्याचा अंदाज आहे.

कारखान्यांना केवळ एफआरपी देणे हे एकच काम नाही. यासह मशिनरी दुरुस्ती करणे, कामगारांचे वेळेत पगार करणे, ऊस तोडणी-वाहतूकदारांचे पैसे देणे, व्यापार्‍यांची देणी यासाठी पैसे लागतात. त्यामुळे साखरेवर कर्ज घेतले जात असून त्याचे प्रमाण मात्र घटू लागले आहे. याचा फटका थेट बँकांना बसला असून कारखान्यांच्या कर्ज उचलीचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बँक व्यवस्थापन अन्य पर्याय शोधत आहेत.

दरम्यान, याचा सर्वाधिक फटका हा जिल्हा बँकेला बसला आहे. मात्र, यातून तत्काळ सावरत अन्य पर्याय शोधण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा बँकेकडे पुढील हंगामात इथेनॉल प्रकल्प आणि कारखाना विस्तारवाढीसाठी काही कारखान्यांनी प्रस्ताव सादर केले आहे. यामध्ये संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतल्यानंतर त्यांना कर्ज पुरवठा केला जाईल. त्यामुळे बॅकलॉग भरून निघणार असल्याने बँकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार नाही. परंतु, ज्या कारखान्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतले आहेत त्यांना फटका बसणार आहे. मात्र, कर्ज उचल कमी झाल्याने कारखान्यांना पुन्हा एकदा ऊर्जितावस्था येण्यास मदत होणार आहे.

व्याज घटल्याचा फायदा शेतकर्‍यांना मिळणार

जिल्ह्यात यंदा इथेनॉलमुळे कारखानदारांना अच्छे दिन आले आहेत. जिल्ह्यातील कारखानदारांना इथेनॉलपासून 660 कोटी रुपये मिळाले आहे. यामुळेच कर्ज उचलीत घट झाल्याने कारखान्यांना द्याव्या लागणार्‍या व्याजात मोठी घट होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे कारखान्यांचे उत्पन्नच वाढणार आहे. हे व्याज वाचल्यामुळे कारखाने एफआरपी वाढवून देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासाठी साखर आयुक्त व शेतकरी संघटनांनी भूमिका घेणे गरजेचे आहे.

Back to top button