खटाव : नेरचे पाणी सोडले; विधातेंचे आंदोलन मागे | पुढारी

खटाव : नेरचे पाणी सोडले; विधातेंचे आंदोलन मागे

खटाव पुढारी वृत्तसेवा : पाटबंधारे विभागाच्या खटाव शाखेत सोमवारी दुपारी 1 वाजता झालेल्या बैठकीत खटाव तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या ब्रिटीशकालीन नेर धरणातील पाणी येरळा नदी आणि कॅनॉलमधून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या विरोधातील उद्याचे आंदोलन मागे घेत असल्याचे प्रदीप विधाते यांनी सांगितले.

या बैठकीस जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, सहायक अभियंता विकास बनसोडे, सुभाष खाडे, कालवा निरीक्षक अमोल लेंभे, शकील पठाण, मधुकर शिंदे आणि पिंपळेश्‍वर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकर्‍यांना नगदी पिकांच्या ओलितासाठी आणि काही गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरेसे उपलब्ध होत नसल्याने नेर धरणातील पाणी त्वरित सोडावे अन्यथा मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा प्रदीप विधाते यांनी शुक्रवारी पाटबंधारे विभागाला दिला होता.

तसेच धरणात सध्या 35 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. त्यातील 25 टक्के राखीव पाणीसाठा सोडून उरलेले 10 टक्के पाणी त्वरित सोडावे, अशी मागणी विधाते आणि शेतकर्‍यांनी या बैठकीत लावून धरली होती. यावर पाटबंधारे विभागाने पाणी तातडीने नदी आणि कॅनॉलमधून सोडण्याचा निर्णय घेतला. पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज ही त्वरित भरून देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर सहाय्यक अभियंता बनसोडे आणि खाडे यांनी तलावातील पाणी नदी आणि कॅनॉल मधून सोडण्याचे आदेश कर्मचार्‍यांना दिले.

सोमवारी सोडण्यात आलेल्या पाण्याची मागणी काही शेतकर्‍यांनी केली आहे. उर्वरीत शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज त्वरित भरुन द्यावेत. जे शेतकरी पाणी मागणी अर्ज न भरता पाण्याचा लाभ घेतील, अशा शेतकर्‍यांवर यापुढे कारवाई करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

शेतकर्‍यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार…

पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील आणि पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी विधाते यांनी फोनवरून चर्चा करून पाणी सोडण्याची मागणी केली होती. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील मुंबई येथे व्यस्त असताना त्यांनी लक्ष घालून पाणी सोडण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिल्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांचे आभार मानले.

हेही वाचा

Back to top button