पाटण : पुनर्रचनेपेक्षाही उमेदवारांवर विजयाचे गणित ठरणार | पुढारी

पाटण : पुनर्रचनेपेक्षाही उमेदवारांवर विजयाचे गणित ठरणार

पाटण ; गणेशचंद्र पिसाळ : गोकुळ तर्फ हेळवाक तथा कोयना जिल्हा परिषद मतदारसंघातील जि. प. व पंचायत समिती मतदारसंघात यावेळी काही गावांची अदलाबदल झाली आहे. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटाचा बालेकिल्ला असणार्‍या याच मतदारसंघात शिवसेनेच्या राज्याचे गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई गटाकडून नेहमीप्रमाणेच कडवे आव्हान निर्माण केले जाणार आहे. या मतदारसंघात कोणते आरक्षण पडणार याबाबत उत्सुकता असली तरी दोन्ही गटाचे पारंपारिक उमेदवार बदलण्यासाठी स्थानिकांचा रेटा आहे. गावांच्या आदलाबदलीपेक्षाही उमेदवार कोण यावरच निकालाचे व आगामी पंचायत समिती सत्तेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

गोकुळ तर्फ हेळवाक या जिल्हा परिषद मतदारसंघात कायमच पाटणकर विरुद्ध देसाई गट असा संघर्ष अनुभवायला मिळाला आहे. वरिष्ठ पातळीवर पाटणकर व देसाई तर स्थानिक मतदारसंघात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार विरुद्ध शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार असाच अपवाद वगळता सामना पाहायला मिळतो. आजवर राजाभाऊ शेलार यांनी निश्चितच पाटणकर यांच्या सहकार्याने हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे.

यापैकी पुर्वीच्या शिरळ मतदारसंघात गतवेळी झालेली आरक्षण पद्धती व त्यानुसार स्थानिक पातळीवर राजकीय इलाज, नाईलाज या पार्श्वभूमीवर राजाभाऊ शेलार हे ओबीसी आरक्षणाच्या तांत्रिक अडचणी पार करत निवडून येत सभापतीही झाले. मात्र लादलेल्या या उमेदवारीचा फटका सत्यजितसिंह पाटणकरांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बसला हेही दुर्लक्षीत करून चालणार नाही.

2017 च्या निवडणुकीत कोयना जि. प. व पं. स. दोन्ही मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होते.आता यावेळच्या निवडणुका ओबिसी आरक्षणासह किंवा शिवाय होणार यासह कोणते आरक्षण पडते यावरच राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. प्रामुख्याने देसाई व पाटणकर गटात शेलारांंचे वाढते वर्चस्व व सातत्याने त्याच कुटुंबांना राजकीय उमेदवार्‍यांबाबत स्थानिक पातळीवर सामाजिक, राजकीय नाराजी व्यक्त होत आहे.

त्यामुळे या बदलत्या राजकीय समीकरणात अशा शेलारमामांना राजकीय खिंडीत गाठण्यासाठी दोन्ही गटांतर्गत गटबाजीतून नाराज उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते असे अनेक राजकीय बाजीप्रभू ऐनवेळी कोणती भूमिका घेणार? याकडे सार्वत्रिक नजरा आहेत. तेच ते उमेदवार आरक्षणापोटी त्यांच्या पत्नी अथवा वारसदारांना संधी मिळाली तर गटांतर्गत गटबाजीतून कोण धारातीर्थी पडणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र, पश्चिम घाट प्रकल्प, इको सेन्सिटिव्ह झोनमुळे अनेक निर्बंध, नियम, जाचक अटी लादण्यात आल्याने स्थानिक मेटाकुटीला आले आहेत. पाटणकरांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ शेलार यांनी आंदोलनातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला आहे. त्याचवेळी अतिवृष्टी, महापूर व गतवर्षी भूस्खलनाचा याच मतदारसंघाला विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे. पूर्वी याच विभागातील फुललेल्या पर्यटनातून स्थानिकांना मिळालेला रोजगार, व्यवसाय व परिसर समृद्ध झाला होता. मात्र गेल्या पाच वर्षात याच पर्यटनासह स्थानिक विकासाला ग्रहण लागल्याने पर्यटकांची संख्या रोडावली .

नैसर्गिक आपत्तीसह पर्यटन बंदीचे अनेक प्रकार घडले. स्थानिक बोटिंग, मासेमारी बंदीमुळे पर्यटन व पर्यायाने स्थानिक जनता उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा काळात कोणत्या नेत्याने आपल्यासाठी काय केले याचाही लेखाजोखा या मतदारसंघातील निवडणुकीत होणार आहे. कोयना जिल्हा परिषद व वाटोळे पंचायत समिती मतदार संघापेक्षा प्रामुख्याने कोयना पंचायत समिती मतदारसंघातील काठावरची जय-पराजयाची लढाई ही यावेळी बदललेली राजकीय समीकरणे, पुनर्रचना व स्थानिक उमेदवारांवर अवलंबून राहणार आहे.

दोन पं. स. व एक जि. प. मतदारसंघातील गावे

1) गोकुळ तर्फ हेळवाक पंचायत समिती गण – मेंढेघर, कोंढावळे, रासाटी, शिवंदेश्वर, हुंबरळी, देशमुखवाडी, हेळवाक, नेचल, केमसे, घाटमाथा, बोपोली, ढाणकल, गोवारे, वाघणे, कोळणे, गोकुळ तर्फ हेळवाक, तोरणे, नानेल, बाजे, वाजेगाव, गाढखोप, मळे, पाथरपुंज, काडोली, नवजा, मानाईनगर, मिरगाव, कामरगाव, शिरशिंगे, पुनवली, गोषटवाडी, डिचोली, डोणीचावाडा, वांझोळे. 2) वाटोळे पंचायत समिती गण – घाणव, घाणबी, चाफोली, चिटेघर, तामकणे, मराठवाडी, दिवशी खुर्द, जुंगटी, खिवशी, निवकणे, म्हारवंड, आंबवणे, वाटोळे, जाईचीवाडी, बोंद्री, भारसाखळे, वन, कुसवडे, केर, पिंपळोशी, गावडेवाडी, धुईलवाडी, नहिंबे, टोळेवाडी, घेरादातेगड, कवडेवाडी, कारवट, आरल, काठी, कातवडी, मेष्टेवाडी.

Back to top button