भाई डोंगरी राहतो चिंता जनतेची करतो : खा. श्रीनिवास पाटील | पुढारी

भाई डोंगरी राहतो चिंता जनतेची करतो : खा. श्रीनिवास पाटील

परळी ; पुढारी वृत्तसेवा : ‘दास डोंगरी राहतो, चिंता विश्वाची करतो’ या उक्तीप्रमाणे या परळी खोर्‍यातील भाई डोंगरी राहतो. मात्र, चिंता जनतेची करतो. भाईंना मी आज एकेरी शब्दांनी उच्चारतो कारण ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. मात्र, त्यांचे कर्तृत्त्व, कार्यसिध्दीही जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला भुषणावह आहे, असे गौरवोद्गार खा. श्रीनिवास पाटील यांनी काढले.

शिवसह्याद्री उद्योग समुहाचे प्रमुख ज्ञानेश्वर (भाई) वांगडे यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त ज्ञानश्री इंजिनिअरिग कॉलेज येथील कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, भाई वांगडे यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्ञानश्री इंजिनिअरिंगचा परिसर गजबजून गेला होता. यावेळी श्रीमंत शिवाजीराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, सारंगदादा पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजु भोसले, माजी उपसभापती सुहास गिरी, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, सभापती सौ. जयश्री गिरी, डॉ. डि. एम. पाटील, ह.भ.प. प्रविण महाराज, चंद्रकांतदादा वांगडे, रोहित वांगडे, धन्वंतरी वांगडे उपस्थित होते.

खा. श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, भाई वांगडे यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे. आद्यात्मिक, शैक्षणिक, सहकार, क्रीडा, समाजकार्य असं कोणतचं क्षेत्र सोडल नाही की त्यात त्यांनी आपला ठसा उमटवला नाही. सातारा सहकारी बँक नावारुपास आणली. शिवसह्याद्री सहकारी पतपेढीच्या माध्यमातून लोकांची आर्थिक उन्नती केली.

खा. उदयनराजे म्हणाले, भाई हे अविरतपणे कार्यरत असून आम्ही नेहमीच त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतो. शिवसह्याद्री परिवाराची व्यापकता, त्यातून निर्माण झालेले ग्रामीण भागातील मुलांसाठीचे रोजगार यामुळे भागातील सर्वात मोठे कुटुंब हे भाई वांगडे यांचे आहे.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आज मुंबईमध्ये गेल्यावर भाईंच्या कार्याचा आवाका आम्हाला समजतो. भाई हे सातारा जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला भूषणावह आहेत. दरम्यान, गृहराज्य राज्यमंत्री शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. शशिकांत शिंदे, विठ्ठल कामत, मोहनबुवा रामदासी यांनी दुरध्वनीवरुन भाईंना शुभेच्छा दिल्या.

Back to top button