वाई : खुल्या जागांमुळे टस्सल; अनेकजण सेफझोनमध्ये

वाई; धनंजय घोडके : वाई नगरपालिकेत यावेळी नगरसेवकांची संख्या 23 राहणार असून महिलांना जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे वाई पालिकेवर महिला राज अवतरणार असून सौभाग्यवतींना संधी प्राप्त झाली आहे. बहुतांश सदस्य सेफझोनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी खुल्या जागा वाढल्याने इच्छुकांची संख्या अधिक राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आता आरक्षण प्रक्रिया पार पडल्यामुळे निवडणुकीच्या तयारीला वेग येणार असून कृष्णा तीरावर पक्षीय झेंडे की आघाड्यांमध्ये घमासान होणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

वाई नगरपालिकेने 1855 साली स्थापना झाली आहे. 2011 च्या जणगणनेनुसार वाई शहराची लोकसंख्या 40 हजार एवढी आहे. त्यानुसार प्रभागरचना निश्चित होवून सोमवारी आरक्षण सोडत पार पडली. त्यामुळे आता निवडणुकीला रंग येणार आहे. निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग पद्धतीलाच मंजुरी दिल्याने पालिकेच्या निवडणुकीत अपक्षांची संख्या मर्यादित राहणार आहे. परंतु क्रॉस मतदानाला प्राधान्य मिळणार आहे. येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भाने आराखडे तयार होऊ लागले आहेत. पण या निवडणुकीत पक्षीय झेंडे झळकणार की पुन्हा आघाड्यांचेच राजकारण होणार, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

सुरुवातीच्या काळात पक्ष किंवा आघाडी असे राजकारण होत नव्हते. मतदारसंघातील आमदारांच्या गटाचे वर्चस्व येथे राहिले आहे पण 1999 पासून पालिकेत आघाड्यांचे राजकारण सुरू झाले आहे. सन 2016 साली झालेल्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीने 14 जागा जिंकत बहुमत मिळवले तर दोन स्वीकृत नगरसेवक असे 16 संख्या झाली पण भाजपच्या डॉ. प्रतिभा शिंदे यांनी थेट नगराध्यक्षा निवडणुकीत एक मताने सरशी करत बाजी मारल्याने सत्तेची तिजोरी राष्ट्रवादीकडे आली असली तरीही चावी मात्र भाजपकडे आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता होती. शेवटच्या काळात नगराध्यपद राष्ट्रवादीकडे आल्याने सध्या वाई नगरपालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. भाजपला आपले वाई शहरातील वर्चस्व निर्माण करण्याची संधी असताना अंतर्गत राजकारणामुळे करता आले नाही. भाजपचे जेष्ठ नेते मदन भोसले यांनी भाजपला कसलेही सहकार्य न केल्याने मिळालेल्या संधीचे सोने करता आलेले नाही.

होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील व नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी आघाडीचे संकेत दिले असून परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे सूतोवाच केले आहे. काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष विराज शिंदे यांनी तरुणांना संधी देऊन स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याची माहिती दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते व किसनवीर कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले, जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे व तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ यांनीही भाजप सर्व जागा पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याची माहिती दिली तर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अनिल शेंडे यांनी राज्यातील फॉर्मुल्यानुसार सन्मानाने आघाडीमध्ये घेतले तर आघाडी अन्यथा स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याची माहिती दिली. एकंदरीत वाई नगरपालिकेची निवडणूक ही रंगत होणार यात शंका नाही.

Exit mobile version