सुरक्षा ग्रील तुटल्याने अपघाताचा धोका वाढला | पुढारी

सुरक्षा ग्रील तुटल्याने अपघाताचा धोका वाढला

कराड : पुढारी वृत्तसेवा :  कराडजवळ कोल्हापूर नाक्यालगत महामार्गाकडेच्या सर्व्हिस रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. सर्व्हिस रस्ते व महामार्गाच्या मधील सुरक्षा ग्रील ठिकठिकाणी तुटले आहेत. त्यामुळे त्यातून नागरिक ये-जा करत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तरी तुटलेले ग्रीलची त्वरीत दुरूस्ती करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.

महामार्गाकडेच्या सर्व्हिस रस्त्यांच्या डागडुजीकडे नेहमीच दुर्लक्ष असते. सर्व्हिस रस्त्याच्या कडेला लावलेले सुरक्षा ग्रील ठिकठिकाणी तुटलेले आहेत. त्याची डागडुजी वेळेत होत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तुटलेल्या ग्रीलमुळे यापूर्वी अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

कृष्णा हॉस्पिटल ते कोल्हापूर नाका दरम्यान ग्रीलसह सुरक्षा कठडेही ठिकठिकाणी तुटले आहेत. कोल्हापूर नाक्याजवळ पंजाब हॉटेलच्या पुढे महामार्ग व सर्व्हिस रस्त्याच्या मध्ये असलेली संरक्षक ग्रील तुटलेले आहे. या तुटलेल्या ग्रीलमधून अनेकवेळा प्रवाशी व नागरिक ये-जा करत असतात. त्यामुळे महामार्गावरून भरधाव वेगात येणार्‍या वाहनांची धडक बसून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याचा विचार करून तुटलेले संरक्षक ग्रील त्वरीत दुरुस्त करून बसवावेत अशी मागणी होत आहे.

त्यातच सर्व्हिस रस्त्याच्या कडेचे नाले तर नेहमी तुंबलेले असतात. प्लास्टीक पिशव्या, गवत नाल्यात पडलेले असल्याने नाले प्रवाही नाहीत. याचा परिणाम म्हणून सर्व्हिस रस्त्याच्या कडेला नेहमी कचर्‍याचे ढीग पडलेले दिसत आहेत. हा कचरा वाहनांमुळे रस्त्यावर पसरतो. काही दिवसांपुर्वी नाल्याची स्वच्छता करण्यात आली. मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी नाल्यात कचरा पडल्याचे दिसून येत आहे.

Back to top button