महाबळेश्वर-पाचगणीला येणार्‍या पर्यटकांना टोलचा दुहेरी फटका | पुढारी

महाबळेश्वर-पाचगणीला येणार्‍या पर्यटकांना टोलचा दुहेरी फटका

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर व पाचगणीला वर्षाकाठी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, येथे येताना महाबळेश्वरच्या नावाखाली पर्यटकांकडून पाचगणी येथील दांडेघर टोल नाक्यावर पर्यटकांची लूट केली जात आहे. महाबळेश्वरला येणार्‍या पर्यटकांकडून प्रवासी व प्रदूषण कराच्या नावाखाली पैसे वसुल करण्यात येतात. या वसुलीमुळे पर्यटक हैराण झाले असून टोल नाक्यावर वाहनांच्या चार पाच किमीच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

पाचगणी-महाबळेश्वरला वर्षाकाठी लाखो पर्यटक भेट देतात. येथे पर्यटनास येणार्‍या पर्यटकांना वाई घाट चढून वर आल्यावर पाचगणीच्या प्रवेशद्वारावरच पालिकेचा दांडेघर टोल नाका आहे. या टोल नाक्यावर दहा-दहा कर्मचारी टोल वसुलीसाठी एका लाईनमध्ये उभे असतात. येथे तासंतास पर्यटक अडकून पडत आहेत. या टोलसाठी मुख्य रस्त्यावरच घाटापर्यंत लांबच लांब रांगा पहावयास मिळतात. त्यामुळे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी कुटुंबीयांसमवेत आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होतो.

तशीच परिस्थिती महाबळेश्वरहून वाईला जाताना असते. पाचगणी येथे येणार्‍या पर्यटकांना सांगितले जाते की, हा कर महाबळेश्वर येथेही चालतो. म्हणून पर्यटक कर तेथे भरून महाबळेश्वरकडे प्रयाण करतात. मात्र, महाबळेश्वरला वेण्णालेक येथे आल्यानंतर पर्यटकांना महाबळेश्वर पालिका व वन व्यवस्थापन समितीचा टोल भरावा लागतो. यामुळे पर्यटकांना दुहेरी कराचा फटका बसत आहे. शिवाय त्यांची फसवणूकही होते आहे. गेली काही वर्षे असाच प्रकार सुरू आहे. जिल्हाधिकार्‍यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

Back to top button