कराड : पाण्याऐवजी हवा तरीही फिरते मीटर | पुढारी

कराड : पाण्याऐवजी हवा तरीही फिरते मीटर

कराड : पुढारी वृत्तसेवा
कराड नगरपालिकेने मीटरप्रमाणे पाणी बील आकारण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, नागरिकांकडून मीटरबाबत वारंवार शंका उपस्थित होत असून जादा बिलाची आकारणी होण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांच्या मनात भीती कायम असतानाच पाण्याऐवजी हवा येऊनही मीटर फिरत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळेच पाण्याऐवजी नुसत्या हवेचेही बील भरायचे का ? असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

अनेक वर्षे रखडलेली 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा कराड पालिकेने सुरू केला. त्यानुसार सर्वच पाण्याच्या टाकीच्या झोनमधून दि. 1 एप्रिल 2022 पासून दररोज सकाळी व संध्याकाळी नेहमीप्रमाणे परंतु मीटर प्रमाणे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, मीटरप्रमाणे पाणी पुरवठा सुरू केल्यानंतर मीटरच्या दराबाबत साशंकता निर्माण करत सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण, माजी नगरसेवक अशोकराव पाटील तसेच व्यापारी, नागरिकांनी याबाबत बिल आकारणी अयोग्य असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके, अभियंता विजय तेवरे यांच्याशी चर्चा केली. मात्र, जेवढा पाणी वापर, तेवढीच बिल आकारणी होणार आहे व त्याची बिले दर तीन महिन्यांनी नागरिकांना दिली जाणार आहेत, असा निर्वाळा संबंधित अधिकार्‍यांनी दिला.

मीटरप्रमाणे पाण्याचा वापर वाढल्यामुळे आवश्यक तेवढेच पाणी नागरिकांकडून वापरण्यात येणार असून पाणीपुरवठा 24 तास सुरू करण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. मात्र, असे असताना मार्केट यार्डमधील आनंदवन कॉलनी तसेच परिसरातील नागरिकांना नळातून पाण्याऐवजी हवाच येत असल्याचे निदर्शनास आले. तसेच असे होत असताना मीटर मात्र वेगाने फिरत असल्याचेही दिसून आले. मीटरप्रमाणे पाणीपुरवठा सुरू करण्यापूर्वीही पाणी येण्यापूर्वी अशीच हवा येत होती आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी पाणी येत असे. मात्र पाणी बिल मीटरप्रमाणे नव्हते, त्यामुळे नागरिकांनी लक्ष दिले नाही.

आता मात्र मीटरप्रमाणे बिल आकारणी सुरू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेने मीटर व्यवस्थीत आहेत का? हे न तपासताच आकारणी सुरू केली आहे. त्यामुळेच आता पाण्याऐवजी हवेचे बील नागरिकांनी भरावयाचे का? असा प्रश्‍न उपस्थित करत शहरातील अन्य भागातील नागरिकांच्या पाणी मीटरबाबत शंका आहेत. तसेच मीटरबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती असून पालिकेने याबाबत त्वरित उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.

अशी आहे दर आकारणी

दि. 1 एप्रिलपासून मीटरप्रमाणे पाणीपुरवठा पालिकेने सुरू केला. यासाठी घरगुती नळ कनेक्शनसाठी प्रती हजार लिटर पाण्यासाठी 8 रुपये दर (0 ते 10 हजार लिटरसाठी तर त्यापुढील पाणी वापरावर 8 ते 10 रुपये दर आकारण्यात आला आहे. तर संस्थांच्या नळ कनेक्शनासाठी 16 रुपये दर आकारणी तर व्यवसायिक नळ कनेक्शनसाठी 40 रुपये प्रति हजारी बिले आकारणी केली आहे.

Back to top button