गुन्हे दाखल करण्यामागे राष्ट्रवादीचे हायकमांड | पुढारी

गुन्हे दाखल करण्यामागे राष्ट्रवादीचे हायकमांड

सातारा : पुढारी वृत्तसेवा :  माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात राष्ट्रवादीच्या हायकमांडसह अनेक नेते सहभागी आहेत. जिल्हा बँकेला ज्यांना माझा त्रास झाला किंवा ज्यांना माझा कायमच त्रास आहे अशी लोक या कटकारस्थानात सहभागी आहेत. माझ्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत सभापतींच्या केबीनमध्ये चर्चा होतात. मी जर खोटा असेल तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन. ते माझ्या व्यक्तिगत जीवनात आले आता केवळ बोलणार नसून दाखवणार आहे, असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला.

विविध गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर प्रथमच आ. जयकुमार गोरे माध्यमांसमोर आले. ते म्हणाले, मी आजपर्यंत कुणाच्याही व्यक्तिगत जीवनात पोहचलो नव्हतो. पण माझ्या घरापर्यंत ते आले आहेत. माझ्या मुलाचा मोबाईल ट्रॅक करण्यात आला तर मुलीला 12 वीच्या परिक्षेला जाता येणार नाही यासाठी प्रयत्न केले गेले. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण यापूर्वी झालेले नाही. प्रभाकर घार्गे व आ. शशिकांत शिंदे यांच्यावरही असे प्रसंग आले होते तेव्हा ते माझे विरोधक असतानाही मी व्यक्तिगत टीका केली नाही किंवा त्यांच्या विरोधात कारस्थाने केली नाहीत. राष्ट्रवादीने मात्र माझ्याविरोधात खालच्या पातळीवर कारस्थाने केली. त्यामुळे आता बोलणार नाही थेट करून दाखवणार आहे. ज्यांची घरे काचेची आहेत त्यांनी काँक्रीटच्या घरांवर दगडी मारू नयेत, असा इशाराही आ. गोरे यांनी दिला.

जिल्हा बँकेत माघार का घेतली? असे विचारले असता आ. गोरे म्हणाले, जिल्हा बँकेवेळी रामराजेंना भेटलो होतो. त्यावेळी तडजोड केली असती तर माझे 3 संचालक बँकेत दिसले असते. मी तत्वाशी तडजोड केली नाही. जर बँकेत पॅनेल टाकले असते तर त्याचवेळी हे गुन्हे दाखल झाले असते, असेही आ. गोरे म्हणाले.

आ. गोरे पुढे म्हणाले, माझ्या विरोधातील कारस्थानात राष्ट्रवादीचे सर्व नेते सहभागी आहेत. माझ्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत सभापतींच्या केबीनमध्ये चर्चा होतात. या प्रकरणात वकीलांची फी देशमुख देत नाहीत. जे कोण देतात त्यांचा तपास करावा. पोलिसांनी हे प्रकरण व्यक्तिगत घेवू नये. कायदेशीर पध्दतीने कारवाई करावी, असेही आ. गोरे म्हणाले.

ईडीची तक्रार मी केल्यानंतर माझ्या विरोधात तक्रारी झाल्या आहेत. प्रस्थापितांविरोधात लढण्याची ताकद आहे याचा आदर्श मी घालून दिला आहे. फलटणकरांमध्ये दम असेल तर लढून जिंकून दाखवावे. या प्रक्रियेत पक्ष व देवेंद्र फडणवीस माझ्यासोबत आहेत.
आ. गोरे पुढे म्हणाले, जमिनीच्या विषयात अ‍ॅफेडेव्हिट कोणी केले याचा तपास पोलिसांनी करावा. त्या अ‍ॅफेडेव्हिटवर सही किंवा अंगठा माझा असल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन. खोटे अ‍ॅफेडेव्हिट केल्याप्रकरणी तहसिलदारांवर गुन्हा दाखल करणार आहे. याचा तपास पोलिसांनी केला नाही तर योग्य यंत्रणेकडून होईल.

आ. गोरे म्हणाले, मायणी मेडिकल कॉलेजवर 150 कोटींचे कर्ज आहे. मी कॉलेज घेतले नसून मी त्यात ट्रस्टी म्हणून गेलो आहे. विविध बाबींसाठी कॉलेजने जे कर्ज काढले आहे त्यातील एकाही कर्जाला चॅरिटी ट्रस्ट्रची मान्यता नाही. कॉलेज सुरू करण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागला. नव्या संचालक मंडळाने कॉलेजच्या देण्यांची यादी ट्रस्टला मागितली. ट्रस्टने याबाबतची यादी मागितली आहे. त्यामध्ये 30 कोटींचे मेडिकल साहित्य खरेदी केल्याचे सांगितले आहे. परंतु, प्रत्यक्षात दोन ते अडीच कोटींचेच साहित्य कॉलेजमध्ये आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी बँकेकडून 15 कोटींचे कर्ज घेतले आहे. नव्या संचालक मंडळाने याची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी बँकेला जोडण्यात आलेल्या बिलांची व पुरवठादारांची महिती गोळा केली. यामध्ये तीन पुरवठादारांनी कॉलेजला साहित्य पुरवठा केल्याचे दिसून आले. या तिन्ही पुरवठादारांना नोटीस बजावली. यामध्ये एका पुरवठादाराचा पत्ताच लागला नाही. तर अन्य दोन पुरवठादारांनी मेडिकल कॉलेजला कोणत्याही प्रकारचे साहित्य दिले नसल्याचे स्पष्ट केले, असेही आ. गोरे यांनी सांगितले.

कॉलेजमध्ये 70 ते 80 विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्र देवून प्रवेश दिले आहेत. त्यांच्याकडूनही लाखो रूपये घेतले आहेत. याप्रकरणी सर्व कागदपत्रे घेवून पोलिस अधीक्षकांना भेटलो. मात्र, त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. या कॉलेजमध्ये मागेल त्या अधिकार्‍याचा सही आणि शिक्का मिळतो. त्यात प्रांत, तहसीलदार यांचाही शिक्का आहे. विधानसभेत लक्षवेधी केल्यानंतर गुन्हा दाखल केला. मात्र ज्याच्यावर गुन्हा दाखल करायचा तो सोडला दुसर्‍यावरच गुन्हा दाखल केला. जेवढी तत्परता माझ्यावर गुन्हा दाखल करताना दाखवली आता पोलिसांनी ती तत्परता गुन्हा दाखल करण्यासाठी दाखवावी, अशी मागणीही आ. गोरे यांनी केली.

बोगस प्रमाणपत्रे छापून अपात्र विद्यार्थी पात्र

मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवेश देण्यात आले. कॉलेजकडून पात्रता नसणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. तसेच 950 विद्यार्थ्यांकडून लाखोंनी पैसे उकळले आहेत. पैसे घेतल्यानंतरही प्रवेश मिळाला नाही म्हणून ज्या ज्या लोकांनी विरोध केला. त्यांना त्या त्या रकमेचे धनादेश देण्यात आले. ते चेक बाऊंस झाले. सध्याच्या घडीला कॉलेजवर चेक बाऊंसच्या 140 ते 145 केसेस सुरू आहेत. बीएएमएसमध्ये प्रवेेशासाठी काही पात्रता लागतात. ती पात्रता मिळवून देण्यासाठी बोगस प्रमाणपत्रे छापून अपात्र विद्यार्थ्यांना पात्र केल्याचा आरोपही आ. गोरे यांनी केला.

दोघांवर केसेस दाखल करणार्‍यांचा कर्ताकरवता एकच : खा. रणजितसिंह

खा. रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, माझ्या व आ. जयकुमार गोरे यांच्याविरूध्द केलेल्या तक्रारीत तथ्य न आढळल्याने तक्रारींचा पाऊस झाला. मात्र, कोर्टाने विचारल्यानंतर संबंधितांना काही सांगता आले नाही. तक्रारी करणे, वकील आणणे व दोघांवर एकत्र केस दाखल करणार्‍यांचा कर्ता करविता एकच आहे. 100 तक्रारी दाखल केल्या तरी फरक पडणार नाही. मोठया तक्रारी दाखल करा जेणे करून जामीन मिळणार नाही. 2024 मध्ये रामराजेंनी लोकसभेच्या रिंगणात यावे, असे आव्हान खा. रणजितसिंह यांनी दिले.

Back to top button